50,000 deaths due to snakebite | सर्पदंशामुळे देशात ५० हजार जणांचा मृत्यू
सर्पदंशामुळे देशात ५० हजार जणांचा मृत्यू

- सागर नेवरेकर 
मुंबई : शहरीकरण वाढत गेल्याने आपला नैसर्गिक अधिवास कमी झाला. त्यामुळे सर्प आता मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत. त्यामुळे सर्पदंशांच्या घटनेत वाढ होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. १ एप्रिल, २०१८ ते ३१ मार्च, २०१९ या वर्षामध्ये महाराष्ट्रात ४२,७७१ सर्पदंशाच्या नोंदी असून, दरवर्षी जगभरात ५४ लाख सर्पदंश होतात. यामध्ये सव्वालाख व्यक्तींचा मृत्यू होतो. भारतामध्ये सर्वाधिक सर्पदंश सुमारे २ ते ३ लाख होतात. यात ५० हजार माणसे मरण पावतात. याशिवाय सर्पदंशामुळे सुमारे दीड लाख लोकांना अपंगत्व येते, असे हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट होत आहे.
हाफकिनच्या संचालिका (अतिरिक्त भार) डॉ. निशिगंधा नाईक यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारतातील सर्पदंशाची आकडेवारी फसवी आहे. कारण कित्येक अशा सर्पदंशांच्या नोंदी नोंदविल्या जात नाहीत. सर्व रुग्णवाहिकांमध्ये सर्पदंशाची लस उपलब्ध करावी, तसेच कुठेही सर्पदंश झाला, तर त्यावर रुग्णाला मोफत उपचार दिला जावा, अशी मागणी हाफकिन संस्थेने केंद्र सरकारकडे केली आहे. महाराष्ट्रातील ८५ टक्के जिल्ह्यांमधून सापांचे विष गोळा करण्याची मोहीम राबविण्यात आली. याशिवाय, मिझोराम, आसाम, अरुणाचल प्रदेश, चंदीगड इत्यादी राज्यांतूनही सापांचे विष जमा केले.
देशामध्ये सर्पदंशावर हाफकिन या सरकारी संस्थेसह इतर पाच खासगी कंपन्या औषधांची निर्मिती करतात. सर्पदंशाची लस बनविणे खूप खर्चिक असते. त्यामुळे काही संस्था व खासगी कंपन्यांनी सर्पदंशावरील लसीची निर्मिती करणे बंद केले. त्यामुळे जगभर लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. हाफकिन संस्थेकडून वेगवेगळ्या तंत्राचा वापर करून नव्या सर्पदंशावरील औषधांचे संशोधन सुरू आहे. विषारी साप चावल्यावर दोन तासांमध्ये लस देणे गरजेचे असते, अन्यथा विषारी घटकांचा परिणाम हा मानवी मज्जासंस्था, हृदय, स्नायूंवर होतो, अशी माहिती हाफकिन संस्थेकडून देण्यात आली.
>भारतातील ३०० पैकी ५२ प्रजाती विषारी
महाराष्ट्रासह मुंबईमध्ये नाग, घोणस, मण्यार, फुरसे हे विषारी साप आढळून येतात. निमविषारी सापामध्ये हरळ टोळ, मांजऱ्या, तपकिरी इत्यादी येतात. तर बिनविषारी सापामध्ये कुकरी, तस्कर, वाळा सर्प, दिवड, एकेरी, नानेटी, मांडोळ, कवड्या इत्यादी सापांचा समावेश आहे. भारतात ३०० सापांच्या प्रजाती असून, त्यात ५२ प्रजाती विषारी आहेत.
>सर्पदंशापासून स्वत:चा बचाव करा, प्राणिमित्र संस्थांची जनजागृती
पावसाळ्यामध्ये साप मोठ्या संख्येने बाहेर पडतात. पावसामध्ये विषारी नाग आणि घोणस हे साप प्रजनन करतात. त्यामुळे सर्पमित्रांना विषारी नाग व घोणस या सापांच्या पिल्लांच्या घटनेविषयी कॉल सर्वाधिक येतात.
सर्पदंश झालेल्या व्यक्तीस त्वरित शासकीय रुग्णालयात न्यावे. जेणेकरून रुग्णाचा जीव वाचू शकतो. साप आढळून आल्यावर प्राणिमित्र संस्था, संघटना आणि सर्पमित्रांना संपर्क करून माहिती देणे गरजेचे आहे, अशा आशयाची जनजागृती मुंबईत केली जात आहे.
>राज्य सर्पदंशाच्या
नोंदी
महाराष्ट्र ४२,७७१
पश्चिम बंगाल ३६,७११
तामिळनाडू २४,६५०
आंध्र प्रदेश १८,७१६
कर्नाटक १६,२५६
उडीसा १५,९४३
उत्तर प्रदेश १२,२९९


Web Title: 50,000 deaths due to snakebite
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.