Join us

मुंबईत शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीच्या अटीतून सवलत; निकालाचे काम वेळेत करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 05:57 IST

१५ जूनपासून राज्यातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या ५० टक्के शिक्षकांनी आणि दहावी - बारावीच्या १०० टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश याआधी शिक्षण विभागाने दिले हाेते

ठळक मुद्देदहावी व बारावीच्या निकालाचे काम वेळेतच पूर्ण होईल, याची काळजी संबंधित शाळा प्रशासनाने घ्यावी, असेही शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांप्रमाणेच शिक्षकांना लाेकलमधून प्रवास करण्याची परवानगी नसल्याने शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे त्रासदायक ठरत आहे. याची दखल घेऊन कल्याण, डोंबविली, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई-विरार, मीरा-भाईंदर तसेच पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतरांना शाळेत ५० टक्के उपस्थित राहण्याच्या अटीपासून शिक्षण संचालनालयाने सवलत दिली आहे. दहावी व बारावीच्या निकालाचे काम वेळेतच पूर्ण होईल, याची काळजी संबंधित शाळा प्रशासनाने घ्यावी, असेही शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप यांनी जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे.

१५ जूनपासून राज्यातील पहिली ते नववी आणि अकरावीच्या ५० टक्के शिक्षकांनी आणि दहावी - बारावीच्या १०० टक्के शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याचे निर्देश याआधी शिक्षण विभागाने दिले हाेते. मुंबई शहरातील ७० टक्के शिक्षक हे ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांतून येतात. त्यांना लोकल प्रवासाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे या शिक्षकांना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभाग, शिक्षक भारती आणि अन्य शिक्षक संघटनांनी राज्य शासनाकडे सातत्याने केली हाेती. तर, लोकल प्रवासाची परवानगी देता येणे शक्य नसल्यास निकालाचे काम ‘वर्क फ्रॉम होम’ करू द्या आणि  निकाल तयार करण्यासाठी  मुदतवाढ द्या, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली होती. अखेर या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत मुंबई विभागातील शिक्षक, शिक्षकेतरांना ५० टक्के उपस्थितीच्या अटींतून सवलत देण्यात आली आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :शिक्षकशिक्षणदहावीचा निकाल