Join us  

युतीचा 50-50 फॉर्म्युला फिक्स! अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 2:40 PM

भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षामध्ये वाटून घेण्याचा निर्णय झाला

मुंबई - महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपामधील युतीचा फॉर्म्युलाबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपद भाजपाकडे राहणार अशी चर्चा रंगू लागली असताना आता शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरेंच्या जवळचे सहकारी वरुण सरदेसाई यांनी ट्विट करत भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षामध्ये वाटून घेण्याचा निर्णय झाला असल्याचं सांगितलं. 

तसेच या ट्विटमधून वरुण सरदेसाई यांनी जे लोक या बैठकीला उपस्थित नव्हते अशा लोकांनी वैयक्तिक फायद्यासाठी भाजपा-शिवसेना युतीत बिघाडी आणू नये असा टोला हाणला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपाच्या युतीमधील जागावाटपावर चर्चा रंगणार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्र जागा लढवतील असं ठरलं आहे. शिवसेना-भाजपा समसमान जागा लढवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. तर 18 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र या फॉम्युल्यावर शिवसेना नाराज होती. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपाने विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. विधानसभेला भाजपाच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी मेहनत घ्या, तसेच मित्रपक्षांच्या जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा असा कानमंत्र राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपा नेत्यांना दिला होता मात्र मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा आग्रही असल्याचीही बातमी आली होती. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी शहा-उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत युतीच्या फॉम्युल्याबाबत ठरलं असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे युवासेनेच्या वरुण सरदेसाई यांनी केलेलं ट्विट अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहणार या भूमिकेवरच युती झाल्याचं निष्पन्न झाल्याचं कळतं. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपा युती झाली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीत विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना सोडून उरलेल्या जागा समसमान लढण्याचा निर्णय झाला होता. ५ वर्षे दोन्ही पक्षांना समसमान मंत्रिपदे व अन्य जबाबदाऱ्या मिळतील असं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचा हट्ट भाजपाने पुरविला का? याचं उत्तर आगामी काळात कळेल. 

 

टॅग्स :शिवसेनाभाजपामुख्यमंत्री