Mumbai Police: मुंबईच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बिश्नोई टोळीशी संबंधित पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि २१ काडतुसे देखील जप्त करण्यात आली आहे. मुंबईतील एक उद्योगपी आणि अभिनेता या आरोपींच्या निशाण्यावर होता. चित्रपटाच्या प्रिमियर वेळीच अभिनेत्यावर हल्ला करण्याचा कट आरोपींनी रचला होता. मात्र त्याआधीच मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळ्या आहेत. गेल्यावर्षी माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांची बिश्नोई गँगकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर होती.
मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अंधेरी येथून कुख्यात बिश्नोई टोळीचे सदस्य असलेल्या पाच जणांना अटक केली. आरोपींना एका बड्या गुंडाच्या सांगण्यावरून मुंबईतील एका व्यक्तीच्या हत्येची सुपारी मिळाली होती. गुन्हे शाखेने पाचही जणांना अंधेरीतल्या प्लॅटिनम हॉटेलजवळून अटक केली. या टोळीने रमजान ईदच्या दिवशी हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र मुंबई पोलिसांनी हा कट उधळून लावला. या कारवाईनंतर हाय-प्रोफाइल सेलिब्रिटींभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा शोध घेतला जात असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. सर्व आरोपी हे हरियाणा, बिहार आणि राजस्थानमधील असल्याची माहिती समोर आली आहे. विकास ठाकूर उर्फ विकी, सुमीत कुमार दिलावर, श्रेयस यादव, देवेंद्र सक्सेना, विवेककुमार गुप्ता अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुमीत कुमार विरोधात यापूर्वीच गोळीबार आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद आहेत. विकास ठाकूरविरोधातही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी करत आहेत.
एक आरोपी गुन्हा करण्यासाठी अंधेरीत येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. तो आरोपी जेव्हा अंधेरीतील हॉटेलमध्ये आला तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. काही महिन्यांपासून ही टोळी मुंबईत सक्रिय झाली होती. २८ मार्च रोजी मुंबई पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली होती. एक बडा सेलिब्रिटी आणि एक उद्योगपती या टोळीच्या निशाण्यावर होता. आरोपींकडून सात पिस्तुलं, २१ काडतुसे, मोबाईल फोनचे डोंगल आणि सिमकार्ड सापडले आहेत.