Join us

साखळी ओढून रेल्वे थांबविणे पडले ५ लाखांना; सात महिन्यांत १,७०० पेक्षा जास्त घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 06:59 IST

या घटनांमुळे आतापर्यंत शेकडो रेल्वे गाड्यांना लेटमार्क लागला आहे.

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात गेल्या सात महिन्यांमध्ये १ हजार ७०० पेक्षा जास्त चेन पुलिंगचा घटना घडल्या आहेत. या प्रकरणी एक हजार १६९ प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून ५ लाख ८५ हजार रुपयांच्या दंड आकारण्यात आला आहे. या घटनांमुळे आतापर्यंत शेकडो रेल्वे गाड्यांना लेटमार्क लागला आहे.

आपत्कालीन परिस्थितीत गाडी थांबविण्यासाठी प्रत्येक रेल्वे डब्यात प्रवाशांसाठी अलार्म चेन असते, जे ओढल्यावर प्रवाशाही हवे तेव्हा गाडी थांबवू शकतात. मात्र, अनेकदा प्रवाशांकडून छोट्याशा कारणासाठी ही चेन पुलिंग करण्याचे प्रकार वाढले. गाडीमधील अलार्म चेन पुलिंगच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट गाडीच्या वेळापत्रकावरच परिणाम होत नाही, तर त्या गाडीच्या मागून चालणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो.

मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने चालतात. त्यांना लेटमार्क लागतो, तसेच एखाद्या किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते. अशा अवास्तव अलार्म चेन पुलिंग घटनांवर मध्य रेल्वे बारीक लक्ष ठेवून आहे. १ एप्रिल ते २६ ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १ हजार ७०८ अनावश्यक अलार्म चेन पुलिंग प्रकरणांची नोंद झाली आहे.

काय आहे नियम?रेल्वे कायदा १९८९ नुसार, चेन पुलिंगसाठी १ हजार रुपये दंड वा एक वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा आहे. साधारणत: ५०० रुपये दंड भरून आरोपींना सोडत असत. दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षाही होऊ शकते.

प्रवाशांना आवाहनअनावश्यक परिस्थितीत अलार्म चेन पुलिंग करणे हा गुन्हा आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आपली ट्रेन सुटण्याच्या किमान ३० मिनिटे आधी स्थानकावर पोहोचण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

टॅग्स :रेल्वे