Supreme Court: प्रसिद्ध युट्यूबर आणि कॉमेडियन समय रैना याच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाने समय रैनासह पाच इन्फ्लुएन्सर्सना न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावले आहे. समय रैनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर दिव्यांग आणि दुर्मिळ आजार असलेल्या व्यक्तींची थट्टा करण्यासाठी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी एक एनजीओने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान कोर्टाने समय रैनासह पाच इन्फ्लुएन्सर्सना समन्स बजावले आहे.
इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये एका दिव्यांग मुलाची चेष्टा केल्याच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात ५ मे रोजी सुनावणी पार पडली. समय रैनावर त्याच्या शोमध्ये एका दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या मुलावर अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने मुंबई पोलिस आयुक्तांना या प्रकरणातील पाचही आरोपींना पुढील सुनावणीत हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. ही नोटीस इंडियाज गॉट लॅटेंटचा होस्ट समय रैनासह ५ इन्फ्लुअन्सर्सना पाठवली जाईल. पुढील सुनावणीत जर हे पाच जण हजर राहिले नाहीत तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं. दिव्यांग व्यक्ती आणि दुर्मिळ विकारांशी संबंधित सोशल मीडिया कंटेंटचे नियमन करण्याची मागणी करणाऱ्या एनजीओ क्युअर एसएमए फाउंडेशन ऑफ इंडियाच्या याचिकेवर खंडपीठ सुनावणी करत होते. अशा लोकांची खिल्ली उडवणारे इन्फ्लुअन्सर्स लोक हानिकारक आणि निराशाजनक असतात. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करावी, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
सुनावणीदरम्यान, एनजीओच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकील अपराजिता सिंह यांनी सांगितले की, हे खूप नुकसानदायक आणि खच्चीकरण करणारे आहे. कायद्याच्या कक्षेत राहून काही सुधारात्मक आणि दंडात्मक कारवाईचा विचार तुम्ही करायला हवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणालाही अपमानित करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असं अपराजिता सिंह म्हणाल्या. सुनावणीदरम्यान, खंडपीठाने दिव्यांग व्यक्ती आणि दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांशी संबंधित सोशल मीडिया कंटेंटवर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबद्दल भाष्य केलं.
काही महिन्यांपूर्वी रणवीर इलाहाबादियाने इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये पालकांविषयी अश्लील टिप्पणी केली होती. त्यानंतर त्याच्यावर तसेच या कार्यक्रमाशी संबधित सर्व लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण सुरू असताना, एनजीओने समय रैनावर त्याच्या स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये स्पाइनल मस्क्युलर अॅट्रोफी (एसएमए) ग्रस्त एका अंध नवजात बाळाची चेष्टा केल्याचा आरोप केला होता.