मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये साडेपाच लाख विनातिकीट; ६ महिन्यांत १५ कोटी ४६ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 13:20 IST2025-10-19T13:19:31+5:302025-10-19T13:20:35+5:30
मध्य रेल्वेच्या लोकलमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात.

मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये साडेपाच लाख विनातिकीट; ६ महिन्यांत १५ कोटी ४६ लाखांचा दंड वसूल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये एप्रिल ते सप्टेंबर अशा सहा महिन्यांत ५ लाख ५० हजार ७९३ फुकटे प्रवासी आढळले असून, त्यांच्याकडून १५ कोटी ४६ लाख ७३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या लोकलमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यापैकी अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते एकूण प्रवाशांच्या तुलनेत २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे तिकीट तपासणी आणखी कठोर केली आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत अंमलबजावणीच्या कार्यात उल्लेखनीय वाढ झाली. त्यात बुक न केलेल्या सामानाच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.
असे आहे दंडात्मक स्वरूप
भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, कोणताही प्रवासी वैध तिकीट किंवा परवाना न घेता रेल्वेने प्रवास करत असल्यास त्याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून संपूर्ण प्रवासाचे भाडे आणि अतिरिक्त दंड वसूल केला जातो. २५० रुपये दंड दंड किमान २५० रुपये किंवा प्रवासाच्या भाड्याच्या तिप्पट, यापैकी जे जास्त असेल तेवढा घेतात.
महिन्याला ९१ हजार फुकट्यांवर कारवाई
मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कारवाईमध्ये दर महिन्याला सरासरी ९१,७९९ प्रवासी विनातिकीट पकडले आहेत. प्रत्येक प्रवाशाकडून सरासरी २८० रुपयांचा दंड वसूल झाला आहे. सर्वाधिक फुकटे प्रवासी जुलै महिन्यात आढळले असून, त्यांची संख्या १ लाख ४ हजार ९६७ इतकी आहे. त्यांच्याकडून २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे.
प्रत्येक महिन्यात केलेल्या कारवाईचा तपशील
महिना दंड (रुपयांत) फुकटे प्रवासी
एप्रिल २ कोटी ६२ लाख ४३ हजार ७७२ ९०,०९०
मे २ कोटी ३९ लाख ९६ हजार १६५ ८१,८९८
जून २ कोटी ७५ लाख २ हजार ४०५ ९७,३६१
जुलै २ कोटी ५० लाख ८ हजार ७६५ १,0४९६७
ऑगस्ट २ कोटी ४५ लाख ४ हजार ६१६ ९१,२२२
सप्टेंबर २ कोटी ३९ लाख १७ हजार ६११ ८५,२५५
एकूण १५ कोटी ४६ लाख ७३ हजार ३३४ ५,०५,७९३