४८५ विद्यार्थ्यांना मिळणार अपघात सानुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 02:05 AM2020-12-18T02:05:22+5:302020-12-18T02:05:27+5:30

३६० लाखांचा निधी; मुंबईत गेल्या २ वर्षांत २ विद्यार्थ्यांनाच लाभ

485 students will get accident sanugrah grant | ४८५ विद्यार्थ्यांना मिळणार अपघात सानुग्रह अनुदान

४८५ विद्यार्थ्यांना मिळणार अपघात सानुग्रह अनुदान

Next

n  सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघात विमा संरक्षण देण्यासाठी राज्यात ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना’ सुरू करण्यात आली आहे. २०२०-२१ या वर्षात राज्यातील ४८५ विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी राज्याकडून ३६० लाखांचा निधी या वित्तीय वर्षात वितरित करण्यास मान्यता दिली आहे. मात्र पालकांमध्ये योजनेबद्दल अपुरी माहिती असलयाने या योजनेसंदर्भात प्रचंड उदासीनता दिसून येत आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात पश्चिम दक्षिण आणि उत्तर विभागांतून मागील २ वर्षांत केवळ २ विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळविता आला. ही दोन्ही प्रकरणे मुंबईच्या पश्चिम विभागातील असून या विद्यार्थ्यांना सदर अपघात सानुग्रह अनुदान मिळवून दिल्याची माहिती शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी दिली. वेळोवेळी ते आपल्या विभागातील शाळांच्या मुख्याध्यापकांना योजनांची माहिती पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी प्रोत्साहित करीत असतात. मात्र पालक या योजनांकडे कागदपत्रांच्या व्यवहारामुळे टाळाटाळ करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुंबईच्या दक्षिण विभागात तर एकही पालक, विद्यार्थ्याने मागील २ वर्षांत सदर योजनेसाठी मुख्याध्यापक किंवा शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे अर्ज सादर केला नसल्याची माहिती शिक्षण निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली. विद्यार्थ्याला अपघात झालाच किंवा काही घटना घडली तरी पालक योजनेसाठी अर्ज करीत नसल्याने मुख्याध्यापकांचा नाइलाज होत असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक मुश्ताक शेख हे मात्र यासंदर्भात माहिती विचारण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही उपलब्ध होऊ शकले नाहीत.

यासाठी मिळते अनुदान
याेजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार, दोन अवयव निकामी झाल्यास ५० हजार व एक अवयव निकामी झाल्यास ३० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या, मोटार अपघात अशा घटनांचा यात समावेश नाही.

अपघात सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी पालकांना एफआयआर, स्थळाचे पंचनामे, सिव्हिल सर्जन डॉक्टरांचे प्रमाणपत्र, आवश्यकता भासल्यास मृत्यू दाखला या सर्व प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागत असल्याने पालक उदासीन असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या.

Web Title: 485 students will get accident sanugrah grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.