वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 09:41 IST2025-12-14T09:40:56+5:302025-12-14T09:41:15+5:30
खारफुर्टीच्या बदल्यात अन्य ठिकाणी तीन पट खारफुटी लावण्यात येतील, असे आश्वासन पालिकेने दिले तरी याबाबत न्यायालयाने शंका व्यक्त केली.

वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
मुंबई : मुंबई-मीरा भाईंदरदरम्यान प्रस्तावित असलेल्या कोस्टल रोड नॉर्थ-२६.३ कि.मी. लांबीच्या वर्सोवा-भाईंदर विकास आराखडा (डीपी) रस्ते प्रकल्पासाठी सुमारे ४५ हजारांहून अधिक खारफुटी तोडण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यासाठी मुंबई महापालिकेला शुक्रवारी परवानगी दिली. खारफुटी तोडण्याच्या परवानगीसाठी मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
खारफुर्टीच्या बदल्यात अन्य ठिकाणी तीन पट खारफुटी लावण्यात येतील, असे आश्वासन पालिकेने दिले तरी याबाबत न्यायालयाने शंका व्यक्त केली. त्यामुळे १० वर्षे याचिका निकाली न काढता पालिकेला संबंधित खारफुटीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी सूचना पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅस्पी चिनॉय यांनी केली. मुख्य न्या. चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हा प्रकल्प मुंबई व मीरा भाईंदरला जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. प्रकल्प क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या ६० हजार खारफुटींपैकी ४५,६७५ खारफुटी तोडाव्या लागतील. त्याच्या तिप्पट प्रमाणात खारफुटींची लागवड करण्यात येईल. त्याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात १०३ हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात येईल, असे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पालिकेच्या म्हणण्यानुसार, १०२ हेक्टर वनक्षेत्र, प्रामुख्याने खारफुटी या प्रकल्पामुळे प्राभावित होणार आहे. प्रत्यक्ष रस्ता बांधकामासाठी सुमारे १० हेक्टर खारफुटी क्षेत्र सुमारे ९००० खारफुटी कापण्यात येतील.
हा प्रस्तावित रस्ता वर्सोवा येथून सुरू होऊन पश्चिम उपनगरांतून दहिसरपर्यंत जाईल आणि पुढे मीरा-भाईंदर येथे संपेल. हा प्रकल्प सध्या कार्यान्वित असलेल्या कोस्टल रोड साऊथ, वरळी-वांद्रे सी लिंक आणि बांधकामाधीन बांद्रे-वर्सोवा सी लिंक यांचा पुढचा टप्पा आहे.