Join us

४५ मिनिटांच्या प्रवासाला लागणार १० मिनिटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 06:20 IST

७० टक्के वेळेची बचत : जुलै २०२३ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी या अंतरासाठी सध्या ४५ मिनिटे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. मात्र, मुंबई किनारी रस्ता प्रकल्पामुळे हे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येईल. अंदाजे ७० टक्के वेळेची तसेच दरवर्षी ३४ टक्के इंधन बचत होईल. कार्बन फूट प्रिंट कमी होईल, असा दावा मुंबई महापालिकेने केला.

सध्या हा रस्ता पूर्णतः टोलमुक्त आहे. १६ जुलै २०१९ रोजीच्या उच्च न्यायालयाच्या निकालानुसार, मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे (कोस्टल रोड) काम बंद झाले होते. या निकालाविरुद्ध मनपाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काम चालू ठेवण्यास मुभा दिली. त्यानुसार तीनही पॅकेजचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले. नियाेजनानुसार, ४ वर्षांत म्हणजे सप्टेंबर २०२२ ला काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु प्रकल्पाविरुद्ध खटल्यातील न्यायालयीन आदेशाने प्रगतीत बाधा आल्याने जुलै २०२३ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

पॅकेज ४ मध्ये बोगद्याचे काम आहे. गिरगाव चौपाटीवर शाफ्टचे काम सुरू आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या १२.१ मीटर व्यासाच्या बोगद्याचे काम  वर्षभरात पूर्ण होईल. प्रियदर्शिनी पार्कपासून हाजी अली दर्ग्यापर्यंत समुद्रात भराव (रेक्लेमेशन) घालण्याचे काम प्रगतिपथावर आहे.अमरसन्स गार्डनजवळ इंटरचेंजचे काम प्रगतीवर असून जेट्टीचे काम पूर्णत्वास आले आहे. २० टक्के काम पूर्ण झाले. पॅकेज २ च्या कामामध्ये दोन पूल, रेक्लेमेशनवरील रस्ता, इंटरचेनचा समावेश आहे. यामधील रेक्लेमेशनचे काम बहुतांश झाले आहे. पहिल्या पुलाचे काम प्रगतीवर आहे. मुख्य पुलाचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. एकंदर १९ टक्के काम पूर्ण झाले.

प्रकल्पाअंतर्गत अनेक गोष्टी नव्यानेप्रकल्पात अनेक गोष्टी नव्याने म्हणजे पहिल्यांदाच केल्या जात आहेत. त्यामध्ये सागर किनाऱ्यावर सीआरझेडच्या तरतुदीनुसार परवानगी घेऊन शास्त्रीय, अभियांत्रिकीचा अभ्यास करून पहिल्यांदाच रस्ता बांधकामासाठी रेक्लेमेशन तसेच १२.१९ मीटर व्यासाच्या बाेगद्याचे काम करण्यात येत आहे. बोगद्याच्या वायुविजन व वाहतूक व्यवस्थापनासाठी स्काडा पद्धतीचा अवलंब पहिल्यांदाच करण्यात येत आहे. रस्ता प्रकल्पासाेबतच उत्तम नागरी सुविधांचाही पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात विकास होत आहे..- शंकर ज. भोसले, कार्यकारी अभियंता, किनारी रस्ता, मुंबई महापालिका

पुरापासून हाेणार संरक्षणn सागरी भिंतीमुळे सागरी किनाऱ्याचे वादळी लाटा, पुरापासून संरक्षण होईल. समुद्राच्या बाजूला प्रदीर्घ लांबी व रुंदीचा प्रोमेनाईड तयार करण्यात येईल. यावर जॉगिंग, सायकल ट्रॅक व बसण्याची सुविधा आहे. हरित उद्याने तयार होतील. प्रथमच बस, रुग्णवाहिकेसाठी समर्पित मार्गिका ठेवण्यात येईल.

टॅग्स :मुंबईउद्धव ठाकरे