Join us
Daily Top 2Weekly Top 5

४५ सिलिंडर, ३ बाईक... गॅस सिलिंडर चोर अखेर जाळ्यात, पवई पोलिसांनी पकडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 10:38 IST

मुंबई, ठाण्यासह आरोपीविरोधात विविध पोलिस ठाण्यांत १० गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात गॅस सिलिंडर चोरून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला पवई पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ४५ गॅस सिलिंडर आणि चोरीसाठी वापरलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पवई पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा २०२४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान या दुचाकीचा वापर करून एक जण विविध ठिकाणी गॅस सिलिंडर चोरी करत असल्याचे उघड झाले. तसेच पवई परिसरात अलीकडेच गॅस सिलिंडर चोरीचे दोन गुन्हे नोंद झाल्याने पोलिसांनी तपास अधिक गतीने सुरू केला. 

सध्याच्या गॅस पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये चिंता असताना या चोरीच्या घटनांमुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये, यासाठी पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने विशेष मोहीम राबवली. दोन स्वतंत्र पथके नेमून तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला. 

अनेक ठिकाणी विक्री

तपासाअंती ठाण्यातील वर्तकनगर येथील राज चंद्रकांत कांबळे (४५) याला ठाणे परिसरातून अटक करण्यात आली. त्याने चौकशीत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपीविरोधात विविध पोलिस ठाण्यांत १० गुन्हे

पोलिसांनी कांबळे याच्याकडून चोरीसाठी वापरलेल्या तीन दुचाकी आणि ४५ सिलिंडर जप्त केले. तसेच चोरीचे सिलिंडर विकण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांवर कारवाई केली. तपासात कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात पवई, शिवाजी पार्क, पार्क साइट आणि नवी मुंबईतील कामोठे पोलिस ठाणे येथे चोरीचे १० गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पवई पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Cylinder Thief Busted in Powai; 45 Cylinders Recovered

Web Summary : Powai police arrested a serial thief stealing and selling gas cylinders in Mumbai, Navi Mumbai, and Thane. They recovered 45 cylinders and three bikes used in the thefts. The accused has 10 prior cases across multiple police stations.
टॅग्स :गुन्हेगारीमुंबई पोलीस