मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 06:07 IST2025-11-26T06:05:33+5:302025-11-26T06:07:48+5:30
दोनपेक्षा जास्त व सर्वाधिक १०३ वेळा नोंद झालेल्या मतदारांची संख्याही मोठी असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीतील दुबार मतदार, कोणत्या प्रभागात दुबार मतदारांची संख्या सर्वाधिक आहे? कोणत्या विभागात कमी आहे? या गोंधळावर अखेर मुंबई पालिकेच्या प्रशासनाने पडदा टाकला आहे. मुंबईत ४ लाख ३३ हजार दुबार मतदार आहेत, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि निवडणूक अधिकारी विजय बालमवार यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
दोनपेक्षा जास्त व सर्वाधिक १०३ वेळा नोंद झालेल्या मतदारांची संख्याही मोठी असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. संबंधित मतदार दोन ते तीन ठिकाणी मतदान करणार नाहीत, यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना काळजी घ्यावी लागेल. राज्य निवडणूक आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेला एकाच मतदाराची अनेक ठिकाणी नोंद असल्याची यादी मिळाली आहे. अनेक मतदारांची नावे विविध प्रभागांत आहे. हे मतदार नेमके कोण आणि कोणत्या विभागातील आहेत याचे सर्वेक्षण करण्याची मोहीम पालिका स्तरावर हाती घेतली जाणार आहे.
नावातील चुका सुधारता येणार
मतदार यादीमध्ये चुकीचे नाव असेल तर पूर्वीप्रमाणे मतदारांना अ व ब असा फॉर्म भरावा लागणार नाही. प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मतदार यादी दुरुस्तीसाठी विशेष कक्ष सुरू केला आहे. या कक्षात जाऊन मतदारांनी आपले नाव चुकीचे आहे, असे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते नाव तेथेच दुरुस्त करण्यात येईल. मतदाराला यासाठी आपले आधार कार्ड अथवा अन्य ओळखपत्र द्यावे लागणार आहे. ज्यांना प्रत्यक्ष जाऊन नावात सुधारणा करणे शक्य नाही, त्यांनी पूर्वीप्रमाणे अ व ब फॉर्म भरून द्यावेत, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
परिशिष्ट -१ न भरणाऱ्या मतदारांकडून मतदानाच्या दिवशी परिशिष्ट -२ भरून आपण एकाच ठिकाणी मतदान केल्याचे हमीपत्र घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुबार मतदानाचा प्रश्न निकाली निघू शकतो. दुबार नावे मतदार यादीतून काढून टाकण्याच्या प्रक्रियेबाबत भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही.
अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
२ वेळा मतदान केल्यास कारवाई
दुबार नाव असलेल्या मतदारांकडून परिशिष्ट -१ भरून, नेमके आपण कुठे मतदान करणार याचे हमीपत्र घेण्यात येणार आहे. ज्या मतदारांची नावे दुबार असतील त्यांच्या नावापुढे दोन चिन्हे असतील. हमीपत्र लिहून दिल्यानंतरही जो मतदार दुसऱ्या ठिकाणी मतदान करण्याचा प्रयत्न करेल, त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.