'जीएमएलआर'साठी जपानहून आले दुसऱ्या 'टीबीएम'चे ४३ भाग; जुळ्या बोगद्याच्या उत्खननासाठी यंत्र आयात
By सीमा महांगडे | Updated: December 17, 2025 13:03 IST2025-12-17T13:03:27+5:302025-12-17T13:03:52+5:30
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी (जीएमएलआर) भूमिगत जुळ्या बोगद्याचे खोदकाम दोन अत्याधुनिक संयंत्रांने (टीबीएम) केले जाणार आहे.

'जीएमएलआर'साठी जपानहून आले दुसऱ्या 'टीबीएम'चे ४३ भाग; जुळ्या बोगद्याच्या उत्खननासाठी यंत्र आयात
सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी (जीएमएलआर) भूमिगत जुळ्या बोगद्याचे खोदकाम दोन अत्याधुनिक संयंत्रांने (टीबीएम) केले जाणार आहे. यापैकी 'टीबीएम'चे सर्व प्रकल्पस्थळी पोहोचले आहेत. तर, दुसऱ्या 'टीबीएम'चे ४३ भागही जपान येथून जेएनपीटी येथे पोहोचले आहेत. ते लवकरच गोरेगाव येथे प्रकल्पस्थळी आणण्यात येणार आहेत. ५.३ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. 'टीबीएम'चे सुटे भाग जेएनपीटी येथे आल्याने बोगद्याचे खोदकाम वेळेत सुरू होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी वर्तवली.
'जीएमएलआर' प्रकल्प चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. सध्या टप्पा ३ (ब) मध्ये गोरेगावच्या फिल्मसिटीत ५.३ किलोमीटर लांबीच्या, तिहेरी मार्गिका असलेल्या बोगद्याचे काम सुरू आहे. 'टीबीएम'चे सुटे भाग जपानहून आयात करण्यात येत आहेत. दरम्यान, 'टीबीएम'चे एकूण ९३ भाग असून, ते १५ जानेवारीपर्यंत दाखल होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहिल्या भागाची जोडणी ऑगस्टमध्ये
१. पहिल्या 'टीबीएम'च्या भागांची जोडणी ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तर, दुसऱ्या 'टीबीएम'च्या सर्व भागांची जोडणी ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाणार असून त्यानंतर बोगद्याच्या खोदकामास प्रत्यक्षात सुरुवात होईल.
२. दुसऱ्या 'टीबीएम'चे २ भाग ९ डिसेंबरला जेएनपीटी येथे दाखल झाले असून, २५ डिसेंबरपर्यंत ते प्रकल्पस्थळी आणण्यात येणार आहेत.
मुंबईतील सर्वात मोठे बोगदे
तिहेरी मार्गिका असलेल्या बोगद्याचे काम अभियांत्रिकीदृष्ट्वा आव्हानात्मक असल्याने 'टीबीएम'ची मदत घेतली जाणार आहे. त्याचे एकूण अंतर सुमारे ६.६२ किलोमीटरपर्यंत असणार आहे. प्रत्येक बोगद्याचा बाह्य व्यास सुमारे १४.४२ मीटर इतका असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे बोगदे मुंबई महानगर क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात मोठे ठरतील, असे अधिकारी म्हणाले.
मालाड ते ऐरोलीदरम्यान थेट प्रवास शक्य
गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता ठरणार आहे. या प्रकल्पामुळे दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्यान नवीन लिंक रोड होणार आहे. पश्चिमेकडील कोस्टल रोड ते मालाड येथील माइंडस्पेस कंपनी आणि थेट ऐरोलीला हा मार्ग जोडला जाणार आहे. कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट मालाड ते ऐरोलीदरम्यान प्रवास करणे या मार्गामुळे सुलभ होणार आहे.