Join us

रस्ते अपघातांत ४१ हजार बळी; मृत्यूचे प्रमाण ४३.७३ टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:09 IST

अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृतांची वाढती आकडेवारी  चिंतेचा विषय बनत असून, वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

मुंबई : राज्यात रस्ते अपघाताच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षांत-२०२२ ते २०२४ दरम्यान राज्यात एकूण ९५ हजार १५० रस्ते अपघात झाले आहेत, ज्यामध्ये ४१ हजार ६१२ लोकांचा मृत्यू झाला आहे. याचे प्रमाण चिंताजनक आहे. कारण यामध्ये मृत्यूचे प्रमाण साधारणतः ४३.७३ टक्के आहे. राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ४५ युनिटच्या माध्यमातून ही आकडेवारी समोर आली आहे.  

मागील तीन वर्षांत वर्षात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत गेल्याचे दिसून आले आहे.  या अपघातांमुळे राज्यातील नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये वाहनांची धडक, ट्रक आणि दुचाकीच्या अपघातांमध्ये जास्त मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या एकूण अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण ४३.७३ टक्के असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.अपघात आणि त्यामध्ये होणाऱ्या मृतांची वाढती आकडेवारी  चिंतेचा विषय बनत असून, वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

 आरटीओने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांमध्ये रस्ते अपघातांची संख्या वाढत असली तरी २०२२ आणि २०२३पेक्षा २०२४ मध्ये मृतांची संख्या कमी झाली आहे. परिवहन विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात सुरू करण्यात आलेल्या नवीन प्रकल्पांमुळे अधिक रस्ते उपलब्ध झाले असून, त्यांच्यामुळे रस्ते अपघातांमध्ये वाढ दिसत आहे. तसेच अपघाती मृतांमध्ये विनाहेल्मेट बाइकवरून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

 रस्ते अपघात रोखण्यासाठी आरटीओमार्फत विविध उपाययोजना आखण्यात येत असून, राज्यातील द्रूतगती महामार्गांवर आयटीएमएससारखी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. तसेच इंटरसेप्टर गाड्यांच्या माध्यमातूनही बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :अपघात