Join us  

'काळम्मावाडी'च्या कामासाठी मान्यतेविना ४० कोटी अदा, कार्यकारी अभियंता निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 5:54 PM

'प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले जातील'

मुंबई : दूधगंगा (काळम्मावाडी) जलसिंचन प्रकल्पाच्या डावा कालव्याच्या कामात ४० कोटींच्या निधीचा अपहारप्रकरणी जबाबदार कार्यकारी अभियंत्यांना तातडीने निलंबित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. शिवाय, तापी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता ज. द. बोरकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश दिले जातील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले.आमदार प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, दूधगंगा प्रकल्पाच्या डावा कालवा ७६ किमीचा आहे. यातील ३२ ते ७६ किमी कालव्याच्या कामात कंत्राटदार आणि कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने अनियमितता झाल्याची वस्तुस्थिती आहे.याप्रकरणी दक्षता पथक, पुणे यांचा प्राथमिक अहवाल ७ ऑगस्ट २०२० मध्ये सरकारला प्राप्त झाला. यात सदरील प्रकरणात अनियमितता आणि अधिकचा निधी दिल्याचे सिद्ध झाले आहे. काम सुरू करण्यापूर्वीच अभियंत्याने कंत्राटदाराचे ४० कोटींचे बिल दिले. त्यामुळे सदरील कार्यकारी अभियंता यांचे तातडीने निलंबन करण्यात येत आहे, अशी घोषणा त्यांनी केली. दरम्यान, दक्षता पथकाच्या अहवालानुसार प्रशासकीय अनियमिततेस जबाबदार असलेल्या एकूण ४६ अधिकाऱ्यांपैकी ४ अधिकारी मयत झाले असून, ४१ अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. हे प्रकरण जुने असल्याने निवृत्त अधिकाऱ्यांवर कारवाई करता येत नसल्याचेही फडणवीस म्हणाले.दूधगंगा डावा कालव्याच्या कामाची निविदा २००१ मध्ये काढण्यात आली होती आणि कामाचे कार्यारंभ आदेश ३० मार्च २००१ला देण्यात आले होते. या कामाचे कंत्राट पी. वेंकू रेड्डी आणि अविनाश भोसले यांना देण्यात आले होते.

टॅग्स :कोल्हापूरधरणमहाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३देवेंद्र फडणवीस