मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 06:55 IST2025-05-20T06:54:50+5:302025-05-20T06:55:32+5:30

या निर्णयावर पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली असून विद्युतदाहिनी किंवा गॅस हा पर्याय नसून लाकूड दहनासाठी मोक्षकाष्ठ हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे.  

4 lakh quintals of wood will be burned in Mumbai's crematorium in 2 years, environmentalists suggest alternative of Mokshakastha, will also provide employment | मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

सुजित महामुलकर

मुंबई : मुंबईतील ४९ हिंदू स्मशानभूमीत मृतदेह दहन करण्यासाठी मुंबई महापालिकेने तब्बल ३ लाख ७० हजार क्विंटल लाकूड खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अंदाजे ३७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही लाकूड खरेदी २०२५ ते २०२७ या दोन वर्षांसाठी आहे. या निर्णयावर पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली असून विद्युतदाहिनी किंवा गॅस हा पर्याय नसून लाकूड दहनासाठी मोक्षकाष्ठ हा एकमेव पर्याय असल्याचे म्हटले आहे.  

महापालिकेने मुंबईतील ज्या ४९ हिंदू स्मशानभूमीसाठी निविदा काढली आहे, त्यातील सात खासगी स्मशानभूमी आहेत. साधारण एका मृतदेहासाठी ३५०-४०० किलो लाकडाची आवश्यकता असते. पालिकेने पुढील दोन वर्षांत ३ लाख ७० हजार क्विंटल लाकडाचा पुरवठा करण्याची व्यवस्था केली आहे. याचा अर्थ केवळ मुंबईत तब्बल ३ कोटी ७० लाख किलो ग्रॅम (१ क्विंटल म्हणजे १०० किलो ग्रॅम) लाकूड मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. 

गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिका पर्यावरणपूरक समजल्या जाणाऱ्या उपाययोजना आखत आहे. या अंतर्गत विद्युतदाहिनी आणि गॅसदाहिनीसोबत आता पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर हा प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू करणार आहे. यात लाकडाच्या कचऱ्यांपासून पॅलेट तयार करून त्याचा वापर अंत्यसंस्करासाठी केला जातो. या यंत्रणेचा वापर केल्यास जवळपास एका मृतदेहामागे २५० किलो लाकूड कमी लागेल, असा दावा पालिकेने केला आहे. मात्र, इतके उपाय करूनही लाकडाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

विद्युत व गॅसदाहिनी निसर्गासाठी चांगली नाही. आपल्याकडे ८० टक्के वीज दगडी कोळसा जाळून मिळते, ज्याने निसर्गाची न भरून निघणारी हानी होते. लाकूड दहनासाठी मोक्षकाष्ठ हा एकमेव योग्य पर्याय आहे. ती अक्षय ऊर्जा आहे. या कृतीत धार्मिक विधी, कर्मकांड पाळता येतात. मोक्षकाष्ठ एक प्रकारचे लाकूड असल्याने लोकांच्या भावनांचा आदर करता येतो. मोक्षकाष्ठ वापरल्यास शेतकऱ्यांचा काडी-कचरा वापरला जाईल, त्यांना आर्थिक फायदा होईल. मोक्षकाष्ठ बनविण्याचे कारखाने सुरू करता येतील, ज्यातून २० हजार लाेकांना रोजगार मिळेल. 
सयाजी शिंदे, अभिनेते, सह्याद्री देवराईचे संस्थापक

महापालिका प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्नशील असून पुढील पाच वर्षांत एकूण २६३ स्मशानभूमींपैकी २२५ पर्यावरणपूरक करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी विद्युतदाहिनी, सीएनजी आणि पीएनजीचा वापर वाढवण्यात येणार आहे.
राजेश ताम्हाणे,  उपायुक्त, पर्यावरण विभाग, महापालिका 

सर्वाधिक वापर 
दौलतनगर     : २१,०५१ 
भोईवाडा     : १९, ०७५
घाटकोपर     : १७,५८६ 
डहाणूकरवाडी     : १६,५९३ 
चकाला     : १४,९१६ 
शिवाजीपार्क     : १४,६७६ 

मोक्षकाष्ठ म्हणजे? 
शेतातील पालापाचोळा, तुराटी, पऱ्हाटी, झुडपं यापासून केलेले ओंडके म्हणजे मोक्षकाष्ठ.  

सर्वात कमी वापर 
ट्रॉम्बे-कोळीवाडा     : ५२३ 
चिता कॅम्प     : ६०८ 
मढ     : ९३६ 
वरळी-कोळीवाडा     : १,१७८ 
नवापाडा     : १,१८६ 
बांगणगा     : १,५७६

Web Title: 4 lakh quintals of wood will be burned in Mumbai's crematorium in 2 years, environmentalists suggest alternative of Mokshakastha, will also provide employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई