४ लाख ७९ हजार शिक्षक उमेदवारांची टीईटीसाठी नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 12:14 IST2025-10-21T12:14:43+5:302025-10-21T12:14:53+5:30
येत्या नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा होणार आहे.

४ लाख ७९ हजार शिक्षक उमेदवारांची टीईटीसाठी नोंदणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच शिक्षकांना टीईटी बंधनकारक करण्यात आली. त्यामुळे नोकरी वाचविण्याच्या उद्देशाने राज्यभरात यंदा ४ लाख ७९ हजार ४५९ शिक्षक उमेदवारांनी टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात ही परीक्षा होणार आहे.
१ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एका महत्त्वाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्वाळ्यानुसार पाच वर्षांहून अधिक सेवा बाकी असेल त्यांना दोन वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. तसेच ज्यांचा पाच वर्षे पेक्षा कमी कालावधी सेवेसाठी उरलेला आहे. परंतु पदोन्नती हवी आहे त्यांनाही टीईटी बंधनकारक करण्यात आली आहे. याप्रकरणी शिक्षकांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयातच याबाबत पुनर्विलोकन याचिका दाखल देखील केली आहे.
‘टीईटी’ नसल्यास पदोन्नतीही नाही
राज्यभरात ठिकठिकाणच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून टीईटी उत्तीर्ण झाल्याशिवाय पदोन्नती नाही, असे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वच शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे पुरोगामी शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्ष हेमलता गावित यांनी सांगितले.
ही परीक्षा दिली नाही तर नोकरी राहणार नाही, म्हणून यावेळी प्रचंड प्रमाणात नोंदणी केली असल्याचे शिक्षक भारती संघटनेच्या मुंबई अध्यक्ष कल्पना शेंडे यांनी सांगितले.
यंदा बहुसंख्य ज्या शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिलेली नाही. अशा शिक्षक उमेदवारांनी १२ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ७९ हजार ४५९ उमेदवारांनी नोंदणी केल्याचे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी लोकमतला सांगितले.