मायानगरीच्या थ्री डी मॅपिंगला गती, बीकेसीनंतर आता सहार गावातही सर्व्हे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:35 IST2025-03-10T14:34:17+5:302025-03-10T14:35:04+5:30
मुंबईच्या अत्याधुनिक नागरी व्यवस्थापनासाठी थ्री डी मॅपिंग करण्याची कार्यवाही पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व येथील सहारा गावात आता ही कार्यवाही सुरू झाली असून या प्रकल्पाला गती मिळाल्याचे चित्र आहे.

मायानगरीच्या थ्री डी मॅपिंगला गती, बीकेसीनंतर आता सहार गावातही सर्व्हे सुरू
मुंबईच्या अत्याधुनिक नागरी व्यवस्थापनासाठी थ्री डी मॅपिंग करण्याची कार्यवाही पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व येथील सहारा गावात आता ही कार्यवाही सुरू झाली असून या प्रकल्पाला गती मिळाल्याचे चित्र आहे. या आधी वांद्रे कुर्ला संकुलामध्ये हे मॅपिंग करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये वरळी क्षेत्राचे थ्री डी मॅपिंग पूर्ण करण्यात आले आहे. महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून ही मोहीम हाती घेण्यात आळी असून मॅपिंगद्वारे भविष्यात विकास आणि त्यावर आधारारित प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मुंबईचा नियोजनबद्ध विकास आणि देखभाल सहज, सोपी, सुलभ व्हावी या अनुषंगाने महानगरचे हुबेहूब डिजिटल मॉडेल तयार करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार सुरू असलेल्या या थ्री डी मॅपिंग प्रकल्पाची शहराचे प्रशासन आणि नियोजन उत्तमरीत्या करण्यासाठी मोलाची मदत होणार आहे.
२५ प्रशासकीय विभाग
थ्री डी मॅपिंगद्वारे मुंबईतील सर्व २५ प्रशासकीय विभागांच्या मिळून ५०० चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे. मुंबईचे सर्वसमावेशक असे डिजिटल प्रतिरुप तयार झाल्यानंतर महानगरच्या सुनियोजित विकास तसेच त्याच्यावर देखरेख करणे अतिशय सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. मुंबईसाठी अद्ययावत आणि सर्वसमावेशक असे त्रिमितीय मॅपिंग विकसीत करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
जिओस्पेशिअलचा वापर
१. जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाचा वापर करुन थ्री डी मॅपिंगची कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व २५ प्रशासकीय विभागांचे मिळून ५०० चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट असेल.
२. या प्रकल्पासाठीचे तांत्रिक साहाय्य जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन आणि वेरिटास (इंडिया) यांच्याकडून पुरविण्यात येत आहे.
तीन वर्षांसाठी सुविधा
मुंबईच्या थ्री डी स्वरुपातील हुबेहुब डिजिटल प्रतिरुप विकसीत करण्यासाठी अद्ययावत, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याच्या जोडीला कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची देखील मदत घेण्यात येणार आहे.