मुंबई - मायानगरी मुंबईतही कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. फेब्रुवारी २०२५ महिन्याच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प पोषण ट्रॅकर अहवालानुसार शहर आणि उपनगरात ३,९२५ इतकी बालके गंभीर कुपोषित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या १६,४२० इतकी आहे. यावरून मुंबईतील कुपोषणाचे वास्तव समोर आले आहे.
पोषण ट्रॅक्टर या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मुंबई शहर जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात नोंदणी झालेल्या बालकांची संख्या ४९,०१९ आहे. तर शहरामध्ये सुदृढ बालकांची संख्या ४३,८९२ आहे. तर गंभीर कुपोषित बालकांची संख्या मुंबई शहरात १,०३८, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या २,९६३ इतकी आहे. उपनगर जिल्ह्यात २,३८,०९४ बालकांची नोंद आहे. उपनगरात २,१७,७५२ बालके सुदृढ आहेत. तर गंभीर कुपोषित २,८८७, तर मध्यम कुपोषित बालकांची संख्या १३,४५७ आहे.
पोषण ट्रॅकर अहवालामुळे मुंबईत कुपोषणाचा प्रश्न कायम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे शासनाने पोषण आहार आणि इतर आवश्यक उपाययोजना राबवण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. तर कुपोषणाच्या समस्यांवर उपाययोजना सुरू असल्याचे स्पष्टीकरण एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाकडून देण्यात आले आहे.
पोषण आहार बेचवसध्या दहा रुपयाला एक कटिंग चहा विकत मिळतो. परंतु शासन केवळ ८ रुपये अंगणवाडीमधील लाभार्थ्यांच्या पाकीट बंद आहारासाठी देते. त्यामुळे आहार बेचव असतो. शासनाने याचा दर वाढवून दिला पाहिजे, असे अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे संघटक राजेश सिंग यांनी सांगितले. तर दर वाढवून देणे, हा केंद्र शासनाच्या अखत्यारीतला मुद्दा आहे, असे एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडून सांगण्यात आले.
मुंबईत स्थलांतर मोठ्या प्रमाणावर आहे. अपुऱ्या सुविधा, आरोग्य आणि पोषणाचे खराब निर्देशांक अशा विविध कारणामुळे बालके कुपोषित होत आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी ६ महिने ते ३ वर्षांच्या बालकांना त्यांच्या मातांना नियमित पोषण आहार दिला जातो. तर ३ ते ६ वर्षांच्या बालकांना गरम ताजा आहार देण्यात येतो. कुपोषणावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.- कैलास पगारे, आयुक्त, एकात्मिक बालविकास प्रकल्प, महिला व बालविकास विभाग