शाळांना मिळणार ३९ लाखांची बक्षिसे; 'मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा' अभियान
By जयंत होवाळ | Updated: January 12, 2024 18:39 IST2024-01-12T18:38:33+5:302024-01-12T18:39:02+5:30
खासगी विनाअनुदानित -विनाअनुदानित शाळांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

शाळांना मिळणार ३९ लाखांची बक्षिसे; 'मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा' अभियान
मुंबई : राज्यासह मुंबईतीलशाळांना राज्यस्तरावर झळकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एवढेच नव्हे तर तब्बल २१ लाख रुपयांचे घसघशीत बक्षिसही जिंकता येणार आहे. 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानाअंतर्गत ही संधी प्राप्त झाली असून एकूण मिळून
३९ लाख रुपयांची बक्षिसे आहेत.
राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधून स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, आनंददायी व प्रेरणादायी शिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत हे अभियान सुरु करण्यात आले असून शाळांना १५ फेब्रुवारीपर्यंत या अभियानात सहभागी होता येईल. मुंबई महापालिका शिक्षण कार्यक्षेत्रातील पालिकेच्या सर्व माध्यमाच्या शाळा तसेच खासगी विनाअनुदानित -विनाअनुदानित शाळांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
असे आहे अभियान
शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधांचे निर्माण, शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी क्षेत्रे अभियानासाठी निश्चित करण्यात आली आहेत. त्यात शाळांचे गुणांकन होईल. विद्यार्थी केंद्रित उपक्रमाच्या आयोजनासाठी ६० गुण , तर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी ४० गुण असतील. पुरस्कार प्राप्त शाळा बक्षिसाच्या रकमांचा विनियोग शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन करतील, असे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ व राजू तडवी यांनी सांगितले.
मिळणार घसघशीत बक्षिस
मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळेला २१ लाख , दुसऱ्या क्रमांकाला ११ लाख आणि तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या शाळेला ७ लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.
० असा नोंदवा सहभाग
https: // education. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपक्रमाची कागदपत्रे school portal वर अपलोड करावीत. अधिक माहितीसाठी headmaster manual उपलब्ध करून देण्यात आले आहे.