Join us

भारतीय कंपन्यांतील 39 टक्के वरिष्ठ पदे महिलांच्या ताब्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 05:10 IST

महिला नेतृत्वामध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानावर; फिलिपिन्स अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भारतीय कंपन्यांतील ३९ टक्के वरिष्ठ पातळीवरील मुख्य कार्यकारी पदांवर (सीएक्सओ) महिला विराजमान असल्याचे ग्रँट थाॅर्नटन या संस्थेच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. कॉर्पोरेट जगतात नेतृत्वस्थानी महिला असण्याच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागला असून, पहिल्या स्थानावर फिलिपिन्स, दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे. 

‘व्यवसायातील महिला २०२१’ या नावाच्या अहवालानुसार, जागतिक पातळीवर उच्च पदांवर महिलांचे प्रमाण सरासरी ३१ टक्के आहे. भारतात या सरासरीपेक्षा महिलांना अधिक संधी दिली गेल्याचे दिसून आले. भारतीय उद्योग व व्यवसायाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असल्याचे यातून दिसून येते. वरिष्ठ व्यवस्थापनात किमान एक महिला असण्याचे प्रमाण जगात वाढून ९० टक्के झाले असताना भारतात ते ९८ टक्के झाले आहे. मीड-मार्केट व्यवसायात सीईओपदी महिलांचे प्रमाण जागतिक पातळीवर २६ टक्के असताना भारतात ते ४७ टक्के आहे. अशा अनेक पातळ्यांवर भारत जागतिक सरासरीच्या पुढे आहे. 

‘ग्रँट थॉर्नटन भारत’च्या भागीदार पल्लवी बाखरू यांनी सांगितले की, २०२०मधील आव्हानात्मक स्थितीत घर आणि काम यातील सीमारेषा धूसर झाल्या आहेत. अशा स्थितीत महिलांना उच्च स्थान देण्यासाठी व्यवसायांची कृती उत्तम आहे. स्री - पुरुषांना समान संधीबाबत भारतीय कंपन्या चांगले काम करीत आहेत. जवळपास ५५ टक्के भारतीय कंपन्यांनी आपल्या श्रमशक्तींत स्री - पुरुषांना समान संधी दिली आहे. ४९ टक्के कंपन्या समावेशक धोरण अवलंबित आहेत. या अहवालासाठी ग्रँट थाॅर्नटनच्या ‘आंतरराष्ट्रीय व्यवसाय अहवाला’चा डाटा वापरण्यात आला. भारतातील २५१ कंपन्यांनी सर्वेक्षणात भाग घेतला

टॅग्स :महिलाजागतिक महिला दिन