Join us

मुंबईत ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण, ११ हजार रिक्षा अन् १ लाख मोबाइल तपासून पोलिसांनी शोधून काढलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 18:29 IST

Mumbai Police Rescue Baby: मुंबई उपनगरातील गोरेगाव येथे वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण केल्याची घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती.

मुंबई

मुंबई उपनगरातील गोरेगाव येथे वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्क ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण केल्याची घटना सहा दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत अपहरण करण्यात आलेल्या बाळाची वनराई पोलिसांनी ६ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरुप सुटका केली आहे. बाळाच्या अपहरणाप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान, या बाळाच्या तपासासाठी पोलिसांनी तब्बल ११ हजार रिक्षांची झाडाझडती घेतली. इतकंच नव्हे तर लाखो मोबाइल नंबरचाही तपास केला. 

गोरेगाव पूर्व वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावरील बस डेपोजवळ २ मार्चच्या रात्री ३८ दिवसांच्या बाळाचं अपहरण करण्यात आलं होतं. याची तक्रार मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. वेगवेगळी पथकं तयार करुन पोलिसांनी शोधाला सुरुवात केली. यात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आणि एक आरोपी लहान बाळाला रिक्षातून घेऊन जाताना आढळून आला. पोलिसांनी तब्बल ११ हजाराहून अधिक रिक्षांची तपासणी केली. आरोपीनं पिवळ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. याच धागा पकडून आरोपीचा शोध सुरू होता. सीसीटीव्हीत दिसून आलेला व्यक्ती मालवणी भागात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. पुढील तपासात बाळ विकण्यासाठी अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली. ५ लाख रुपयांना या बाळाची विक्री केली जाणार होती. तपासात आणखी तीन आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद आसिफ मोहम्मद उमर खान (४२), फातिमा जिलानी शेख (३३), राजू भानुदास मोरे (४७), मंगल राजू मोरे (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस