36 stalls expelled from railway stations, built on Central Railway during the year after Elphinstone Accidents, 20 pedestrian bridges | रेल्वे स्थानकांतून ३६ स्टॉल हद्दपार, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर वर्षभरात मध्य रेल्वेवर बांधले २० पादचारी पूल

रेल्वे स्थानकांतून ३६ स्टॉल हद्दपार, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर वर्षभरात मध्य रेल्वेवर बांधले २० पादचारी पूल

मुंबई : एल्फिन्स्टन (प्रभादेवी) दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांतील स्टॉल हटविण्याच्या सूचना न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिल्या. या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने १० तर मध्य रेल्वेने २६ स्थानकांतील स्टॉल हटवत प्रवाशांसाठी फलाट मोकळे केले आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आतापर्यंत मध्य रेल्वेवर ६९ सरकते जिने आणि ३३ लिफ्ट उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. तर पश्चिम रेल्वेने १६ सरकते जिने आणि १० लिμट उभारल्या आहेत. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त केलेल्या हाय पॉवर समितीने प्रवासी वर्दळ विनाअडथळा पार पडण्यासाठी फलाट ‘स्टॉल’मुक्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार पश्चिम रेल्वेने चर्चगेटमधील ३, मरिन लाइन्स येथील २ आणि चर्नी रोड स्थानकातील एक स्टॉल हटविला. त्याचबरोबर चर्चगेट, मरिन लाइन्स,
गोरेगाव, मालाड, कांदिवली स्थानकांतील प्रवासी मार्गात अडथळा बनत असलेल्या प्रत्येकी एका स्टॉलची जागा बदलण्यात आली आहे. यात फूड स्टॉल, शू पॉलिश स्टॉल आणि अन्य प्रकारच्या स्टॉलचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे तत्कालीन एल्फिन्स्टन अर्थात आजच्या प्रभादेवी स्थानकावर २९ सप्टेंबर २०१७ रोजी २३ प्रवाशांना चेंगराचेंगरीमुळे जीव गमवावा लागला होता. अरुंद पादचारी पुलांमुळे घडलेल्या या दुर्दैवी
घटनेनंतर वर्षभरात पश्चिम रेल्वेने एकूण १३ पादचारी पुलांचे काम पूर्ण केले असून, २५ पादचारी पुलांचे काम यंदाच्या वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. मध्य रेल्वेवर वर्षभरात सुमारे २० पादचारी पूल उभारण्यात आले
असून, ४४ पादचारी पुलांचे काम सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

घटनेने आजही मन सुन्न
माझ्या आयुष्यातील ‘तो’ काळाच दिवस आहे. त्या दिवशी गर्दी
अंगावर आल्याने मी कोसळले. त्यानंतर थेट केईएम रुग्णालयातच मी
शुद्धीवर आले होते, पण आजही तो दिवस विसरता येत नाही. दरम्यान,
समुपदेशनही झाले. पण त्या आठवणींचा ओरखडा कायम मनावर
आहे.त्यानंतर काही काळ तिथून प्रवास करणे टाळले होते. पुन्हा निर्धाराने
उभे राहण्यासाठी कुटुंबासह सर्वांनीच पाठिंबा दिला. आता तोच रस्ता आहे,
पुन्हा दिनक्रम सुरू झाला आहे. - अर्पणा सावंत, जखमी (काळाचौकी)

...जगणे थांबविले नाही
एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेत मी आणि आई दोघीही जखमी झालो होतो.
सुदैवाने फार शारीरिक जखमा नसल्या तरी मनाच्या जखमा खोल
झाल्या आहेत, याची जाणीव रुग्णालयात उपचार घेत असताना झाली. तो
दिवस, ती वेळ, घटना सगळेच आजही डोळ्यांसमोर तसेच आहे. अशी
दुर्घटना पुन्हा घडू नये, हीच इच्छा आहे. उपचारानंतर पुन्हा दिनक्रम सुरू
करताना मानसिक अडथळे खूप आले खरे, पण शेवटी दिनक्रम सुरू आहे.
जगणे थांबवलेले नाही. -

मध्य रेल्वे प्रशासनाने उपलब्ध केलेली सुविधा
सरकते जिने : मध्य रेल्वेवर एकूण ६९ सरकते जिने बसवण्यात आले असून
यापैकी गेल्या वर्षात ५८ सरकते जिने कार्यान्वित करण्यात आले आहेत.
सद्य:स्थितीत ९ सरकत्या जिन्यांचे काम सुरू आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजूर करण्यात
आलेल्या १७२ सरकत्या जिन्यांचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
पादचारी पूल : गेल्या १२ महिन्यांच्या काळात २० पादचारी पूल उभारण्यात
आले आहेत. ४४ मंजूर पादचारी पुलांची कामे येत्या वर्षभरात पूर्ण करण्यात येणार
आहेत. सद्य:स्थितीत मध्य रेल्वेवर एकूण १६७ पादचारी पूल आहेत.
लिμट : गेल्या वर्षात एकूण २८ लिμट कार्यरत करण्यात आल्या. सध्या ५
लिμटचे काम सुरू आहे. ६५ मंजूर लिμटचे काम लवकरच सुरू करण्यात येईल.
सरकते जिने : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागासाठी एकूण ११० सरकते जिने
मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी उपनगरीय रेल्वे स्थानकांसाठी ८९ सरकत्या
जिन्यांची तरतूद आहे. येत्या वर्षभरात १६ सरकत्या जिन्यांचे काम पूर्ण करण्यात
येणार आहे.
पादचारी पूल : गेल्या वर्षात ११ पादचारी पूल उभारण्यात आले असून २
पादचारी पुलांच्या पायऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. येत्या वर्षभरात २५
पादचारी पूल उभारण्यात येणार असून उर्वरित ३३ पादचारी पूल २०२० पर्यंत
प्रवाशांसाठी खुले करण्याचे लक्ष्य आहे.
लिμट : मुंबई विभागासाठी ५६ लिμटना मंजुरी देण्यात आली असून यापैकी
उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ५४ लिμटचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेवर १० लिμट
कार्यरत करण्यात आल्या आहेत. ७ लिμट येत्या वर्षभरात कार्यान्वित होतील.
सुरक्षा : मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त गर्दी नियंत्रणासाठी महाराष्ट्र
सुरक्षा बलाचे २५० जवान तैनात केले आहेत. सद्यस्थितीत रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा
बल, महाराष्ट्र सुरक्षा बलासह बहुतांशी उपनगरीय स्थानकांत सीसीटीव्ही कार्यान्वित
करण्यात आले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 36 stalls expelled from railway stations, built on Central Railway during the year after Elphinstone Accidents, 20 pedestrian bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.