ओमान येथून ३६ भारतीय कामगारांची केली सुखरूप सुटका; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्तक्षेपामुळे मायदेशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:15 IST2025-10-09T11:15:17+5:302025-10-09T11:15:28+5:30
ओमानमधील १८ भारतीय कामगार अत्यंत दयनीय परिस्थितीत राहत असून, नियोक्त्यांकडून त्यांचे शोषण होत असल्याची माहिती खा. गोयल यांना देण्यात आली.

ओमान येथून ३६ भारतीय कामगारांची केली सुखरूप सुटका; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्तक्षेपामुळे मायदेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘द गोट लाइफ’ हा सिनेमा मध्यंतरी आला होता. या सिनेमातील नायक परदेशात जातो आणि अडकतो. त्याला अज्ञातस्थळी नेऊन कामाला जुंपले जाते. त्यांचे प्रचंड हाल केले जातात. ओमानमध्ये अशाच गंभीर परिस्थितीत आणि अडचणीत सापडलेल्या ३६ भारतीय कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आणि उत्तर मुंबईचे खा. पीयूष गोयल यांच्या हस्तक्षेपामुळे या कामगारांना मायदेशी परतता आले.
ओमानमधील १८ भारतीय कामगार अत्यंत दयनीय परिस्थितीत राहत असून, नियोक्त्यांकडून त्यांचे शोषण होत असल्याची माहिती खा. गोयल यांना देण्यात आली. भाजप उत्तर मुंबई वॉर्ड क्र. २४ चे अध्यक्ष गोविंद प्रसाद यांनी याप्रकरणी खा. गोयल यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता.
अनेक महिने पगाराविना, पासपोर्टही घेतला काढून
या कामगारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले. त्यांना अनेक महिने पगारही मिळाला नाही. तसेच त्यांचा पासपोर्टही काढून घेण्यात
आला होता. दरम्यान, भारतीय नागरिकांचे कल्याण, सन्मान आणि सुरक्षा हेच केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया खा. गोयल यांनी भारतीय कामगारांच्या सुटकेनंतर दिली.
दूतावासाशी साधला संपर्क
वाणिज्य मंत्र्यांच्या कार्यालयाने त्यानंतर तत्काळ ओमानमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
दूतावासाने सर्व ३६ कामगारांना तत्काळ सुरक्षित स्थळी, स्थानिक गुरुद्वारात हलविले आणि त्यांना आवश्यक तात्पुरता आश्रय दिला.
काही दिवसांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांना भारतात परत पाठविण्यात आले.