जिल्ह्यात वर्षभरात ३२० जणांना मिळाली दृष्टी

By Admin | Updated: June 9, 2015 23:04 IST2015-06-09T23:04:26+5:302015-06-09T23:04:26+5:30

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात २०१४ ते २०१५ या वर्षात ३२० अंधाना दृष्टी देण्याचे काम ठाण्यातील नेत्रदान संकलन केंद्र, नेत्रपेढ्या आणि सामान्य जिल्हा रुग्णालय यांनी केले आहे.

320 people received in the district this year | जिल्ह्यात वर्षभरात ३२० जणांना मिळाली दृष्टी

जिल्ह्यात वर्षभरात ३२० जणांना मिळाली दृष्टी

भाग्यश्री प्रधान, ठाणे
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात २०१४ ते २०१५ या वर्षात ३२० अंधाना दृष्टी देण्याचे काम ठाण्यातील नेत्रदान संकलन केंद्र, नेत्रपेढ्या आणि सामान्य जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने करण्यात आल्याची माहिती जिल्हा सामान्य रूग्णालयाचे नेत्रचिकित्सक डॉ. दिलीप आहिरे यांनी सांगितले. सुप्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉ. भालचंद्र यांचा जन्म दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी १० जून हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो.
श्रीलंकेत सर्वाधिक नेत्रदान केले जाते. मात्र तेच प्रमाण भारतात अतिशय कमी आहे. मोतीबिंदू, काचबिंदू तसेच चष्मा असणारे नागरिक नेत्रदान करू शकतात. मात्र एचआयव्ही पॉझिटीव्ह, कॅन्सर तसेच रेबीज झालेले रूग्ण नेत्रदान करू शकत नाहीत, अशी माहिती सामान्य जिल्हा रूग्णालयातील नेत्रचिकित्सक आहिरे यांनी दिली. मृत्यूनंतर जास्तीत जास्त सहा ते सात तासांच्या आत डोळे काढणे आवश्यक असते. त्यानंतर ते एका बर्फ असलेल्या खास पेटीत रोगप्रतिबंध द्रव्यात बुडवून नेत्रपेढीत नेले जातात आणि ४८ तासांत त्याचे रोपण दुसऱ्या रुग्णावर केले जाते अशी माहितीही त्यांनी दिली.
धर्मादाय संस्था आणि व्यक्ती यांनी दिलेल्या देणगीतूनच नेत्रपेढी आपला खर्च चालवित असते, अशी माहिती ठाण्यातील सहीयारा नेत्रपेढीने दिली.

४जगात सर्वाधिक नेत्रदान श्रीलंकेत होते. नेत्रांची निर्यातही होते.
४भारतात गरजेच्या फक्त १० टक्के नेत्रदान केले जाते. त्यामुळे प्रतिक्षा यादी वाढते.
जिल्हा सामान्य रूग्णालयाचे नेत्रदानाचे वार्षिक टार्गेट ४०० होते. मात्र ५३७ नागरिकांनी नेत्रदान केले आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यात १० नेत्रपेढ्या असून त्यातील ८ नेत्र संकलन केंद्र आहेत. तसेच यातील कारखानीस हॉस्पीटल, वारीकर हॉस्पीटल तसेच डोंबिवली मानव कल्याण केंद्र येथे नेत्रदान स्वीकारले जाते अशी माहिती जिल्हा रूग्णालयात नेत्रचिकित्सक विभागातील दिलीप आहिरे यांनी दिली. तर संपूर्ण जिल्ह्यात वार्षिक उद्दिष्टांपैकी ८५ टक्के मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 320 people received in the district this year