३२ हजार फॅन्सी नंबरची विक्री, आरटीओने कमावले १४ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:23 IST2025-05-20T15:23:19+5:302025-05-20T15:23:27+5:30

मुंबईत वाहनमालकांमध्ये विशेष नोंदणी क्रमांकांची मागणी वाढली; मोठी रक्कम देण्यास तयार

32 thousand fancy numbers sold, RTO earns Rs 14 crore | ३२ हजार फॅन्सी नंबरची विक्री, आरटीओने कमावले १४ कोटी

३२ हजार फॅन्सी नंबरची विक्री, आरटीओने कमावले १४ कोटी

मुंबई : अनेकांना कार किंवा दुचाकी असणे हे केवळ ब्रँड किंवा मॉडेलबद्दल नाही तर वैयक्तिक पसंती, भाग्यवान अंक दर्शविणारा नोंदणी क्रमांकदेखील असतो.  त्यामुळे फॅन्सी नंबरबाबतचे हे वाढते आकर्षण राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी (आरटीओ) उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत ठरत आहे. जानेवारी ते डिसेंबर २४ या कालावधीत मुंबईतील ताडदेव, वडाळा, बोरिवली आणि अंधेरी या चार आरटीओमधून तब्बल ३२ हजार ८२१ फॅन्सी नंबरची विक्री झाली. त्यातून परिवहनच्या तिजोरीत ४३ कोटी ९२ लाख ६ हजारांचा महसूल जमा झाला.  जानेवारी ते एप्रिल दरम्यान ७,७७४ नंबरच्या विक्रीतून १४ कोटी ६७ लाख १३ हजारांचे उत्पन्न आरटीओने कमावले.
वाहनमालकांमध्ये विशेष नोंदणी क्रमांकांची मागणी वाढत आहे. यात जन्मतारीख, भाग्यवान अंक, सहज ओळखता येणारे क्रमांक घेण्याकडे  ओढा वाढला आहे. यातील बरेच जण वाहन डीलरशिपला भेट देण्यापूर्वीच त्यांचा क्रमांक सुरक्षित करण्यासाठी मोठी रक्कम देण्यास तयार असतात.

... तर बोली प्रक्रियेद्वारे सर्वाधिक रक्कम
वाहतूक विभागाच्या नियमांनुसार, विशिष्ट क्रमांकात रस असलेल्या कोणालाही आरटीओकडे नियुक्त केलेल्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट आगाऊ सादर करावा लागतो. 
एकदा स्वीकारल्यानंतर, तो क्रमांक केवळ अर्जदारासाठी राखीव असतो. एकाच क्रमांकासाठी अनेक व्यक्ती अर्ज करतात. अशा प्रकरणांमध्ये, बहुतेकदा बोली प्रक्रियेद्वारे सर्वाधिक रक्कम देणाऱ्या अर्जदाराला तो क्रमांक दिला जातो. 
आरटीओने सप्टेंबर २०२४ मध्ये फॅन्सी क्रमांकाच्या शुल्कामध्ये दुपटीने वाढ केली होती. त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.

ऑनलाइन फॅन्सी             नंबर प्रक्रिया
फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी परिवहन संकेतस्थळावर जाऊन मोबाइल आणि ई-मेलच्या मदतीने ओटीपी मिळवून रजिस्ट्रेशन करावे. उपलब्ध असलेल्या चॉईस क्रमांकांमधून आवडीचा क्रमांक निश्चित करा. 
पैसे ऑनलाइन  भरा. एका क्रमांकासाठी अधिक अर्ज आल्यास  त्यासाठी लिलावाची प्रक्रिया ऑफलाइन ठेवण्यात येत असून, त्या क्रमांकासाठी अधिकचे पैसे मोजणाऱ्याला त्या क्रमांकाची ऑफलाइन पावती देण्यात येते. 

६ लाख रुपये मोजा - 
०००१ या क्रमांकासाठी मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक या शहरांमध्ये सहा लाख रुपये मोजावे लागत आहेत. 

फॅन्सी नंबर विक्री
जानेवारी ते एप्रिल २५
आरटीओ    अर्ज    महसूल
ताडदेव    २,१३१    ३,८६,४०,०००
अंधेरी    २,३३८    ५,२१,५९,०००
बोरिवली    ६९३    १,२७,३७,०००
वडाळा    २,६१२    ४,३१,७७,०००
एकूण    ७,७७४    १४,६७,१३,०००

जानेवारी ते डिसेंबर २४
आरटीओ    अर्ज    महसूल
ताडदेव    ८,९६६    १३,२४,५९,५००
अंधेरी    ७,५५०    १०,७८,८१,५००
बोरिवली    ८,१२४    १०,५४,१७,०००
वडाळा    ८,१८१    ९,३४,४८,०००
एकूण    ३२,८२१    ४३,९२,०६,०००

वाहनांसाठी फॅन्सी नंबर विक्रीसाठी आरटीओकडून  लिलावही आयोजित केला जातो. यात पसंतीचा नंबर निवडू शकता. 

Web Title: 32 thousand fancy numbers sold, RTO earns Rs 14 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.