304 applications for MHADA's house | म्हाडाच्या घरांसाठी मोठी चुरस, एका घरामागे तब्बल ३०४ अर्ज
म्हाडाच्या घरांसाठी मोठी चुरस, एका घरामागे तब्बल ३०४ अर्ज

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने २१७ घरांची जाहिरात काढण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून अर्जदारांना लॉटरीची प्रतीक्षा आहे. या लॉटरीतील घरांसाठी मोठी चुरस निर्माण झाली असून एका घरामागे तब्बल ३०४ अर्ज म्हाडाकडे अनामत रकमेसह दाखल झाले आहेत. या लॉटरीसाठी तब्बल ६६ हजार ९२ अर्ज दाखल झाले असून २ जूनला म्हाडा भवनामध्ये पार पडणाऱ्या या सोडतीमध्ये हे अर्जदार आपले नशीब अजमावणार आहेत.
लॉटरीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत १,८४,२५४ जणांनी नोंदणी केली, तर ७८,७७३ जणांनी अर्ज दाखल केले, मात्र ६१,०३८ जणांनी आॅनलाइन तर ५,०५३ जणांनी आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरली. आता ३० मे रोजी यापैकी
पात्र ठरलेल्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर २ जूनला म्हाडा भवनामध्येच लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सदनिका सोडतीमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी सहकार नगर, चेंबूर येथील १७०, मध्यम उत्पन्न गटाच्या चेंबूर आणि पवई येथील ४७ सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे.
>२७४ दुकानांची लॉटरी १ जूनला पार पडणार
म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळातील २७४ दुकानांची सोडत १ जूनला पार पडणार आहे. या लॉटरीसाठी आॅनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २७ मे ही देण्यात आली आहे. या दुकानांसाठीची ई-टेंडर जाहिरात ३० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या सोडतीमध्ये २९ मे ते ३१ मे दुपारी २ वाजेपर्यंत आॅनलाइन बोली खुली आहे. सोडतीत सायन-प्रतीक्षानगर येथे ३५ दुकाने, मालाड-मालवणी येथे ६९, गव्हाणपाडा-मुलुंड, विनोबा भावेनगर कुर्ला, गोरेगाव येथे दुकाने आहेत. कोकण मंडळाची विरार-बोळिंज, वेंगुर्ले येथे दुकाने आहेत.


Web Title: 304 applications for MHADA's house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.