Join us  

विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी आयआयटीकडून ३०० कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 3:14 AM

विद्यार्थ्यांसाठी आयआयटी स्तरावर ३०० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आयआयटी बॉम्बेचे नवनियुक्त संचालक प्राध्यापक सुभासिस चौधरी यांनी दिली.

मुंबई : आयआयटीमधील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मिळणारी फेलोशिपची रक्कम खूप कमी असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांसाठी आयआयटी स्तरावर ३०० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आयआयटी बॉम्बेचे नवनियुक्त संचालक प्राध्यापक सुभासिस चौधरी यांनी दिली. मुंबईचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच गुरुवारी २५ एप्रिलला त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. मात्र, या रकमेत गेल्या चार वर्षांपासून वाढ करण्यात आली नव्हती. या विरोधात देशभरातील विविध संशोधन संस्थांच्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनेही केली होती. आयआयटी बॉम्बेमध्येही यासाठी आंदोलन करण्यात आले होते. आमच्याकडून हा निधी आयआयटीच्या केंद्रीय स्तरावर पुरविला जातो, जिथून विद्यार्थ्यांना, तसेच प्राध्यापक आणि मार्गदर्शक यांच्या पातळीवरही काही निधी वितरित केला जाईल, ज्याचा उपयोग त्यांना त्यांचे प्रकल्प, संशोधन पूर्ण करण्यात होईल, असे प्राध्यापक चौधरी यांनी अधिक माहिती देताना सांगितले.आयआयटीतर्फे दरवर्षीच विद्यार्र्थ्यांच्या संशोधनासाठी संस्थेकडून ३०० ते ३५० कोटी रुपयांची तरतूद केली जात असल्याची माहिती यावेळी उपसंचालक (शैक्षणिक व पायाभूत सुविधा) ए.के. सुरेश यांनी दिली.

नवीन वसतिगृहाचे बांधकाम सुरूआयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्र्थ्यांची संख्या दरवर्षी २,५०० ने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यापेक्षा त्यांच्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची वाढ करण्याचा प्रयत्न आयआयटी बॉम्बेकडून केला जात आहे. यासाठी संस्थेच्या आवारात नवीन वसतिगृहांची बांधकामे सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामुळे वसतिगृहातील खोल्यांची संख्या १२,००० ने वाढणार आहे. याचा परिणाम विद्यार्थी, शिक्षक या प्रमाणावरही होणार असून, त्यांचीही काळजी घेण्यात येईल. मात्र, त्यासाठी घाई न करता, कौशल्य असलेल्या उत्तम शिक्षकांचीच निवड केली जाईल, अशी माहिती आयआयटी प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :विद्यार्थीआयआयटी मुंबई