३० टक्के गाळ अजूनही नाल्यातच! ३१ मेच्या डेडलाइनला उरले फक्त सहा दिवस
By सीमा महांगडे | Updated: May 26, 2025 11:50 IST2025-05-26T11:47:34+5:302025-05-26T11:50:13+5:30
मुंबई महापालिकेसमोर नालेसफाईचे आव्हान

३० टक्के गाळ अजूनही नाल्यातच! ३१ मेच्या डेडलाइनला उरले फक्त सहा दिवस
सीमा महांगडे
मुंबई : मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर आता मुंबईत पावसाचे लवकरच आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईतील नाल्यांमध्ये अजून ३० टक्के गाळ तसाच आहे.
मुंबईतील सर्व छोट्या, मोठ्या नाल्यांची ७० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यातही मिठी नदीची सफाई फक्त ५२ टक्केच होऊ शकली आहे. अवकाळी पावसामुळे नालेसफाईत अडथळा येत असल्याचे कारण पालिकेकडून देण्यात आले तरी डेडलाईन संपायला फक्त सहा दिवस उरले आहेत.
६६% २५ मे पर्यंतची एकूण नालेसफाई
३ टप्प्यांत छोट्या आणि मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्यात येतो. मुंबईत पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्यात १० टक्के आणि पावसाळा संपल्यावर १० टक्के अशा तीन टप्प्यांत छोट्या आणि मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्यात येतो.
३९५ कोटी रुपये खर्च
१ मुंबई महापालिकेने २३ कंत्राटदारांकडे नालेसफाई आणि मिठी नदी व इतर नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे दिली आहेत. त्यासाठी पालिका तब्बल ३९५ कोटी रुपये खर्च करणार आहे.
२ पालिकेच्या म्हणण्यांनुसार मोठ्या नाल्यांचा सफाईचा पहिला टप्पा १५ मे रोजी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या नाल्यांच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे.
३ छोट्या नाल्यांची सफाई अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यातील गाळ, कचरा मोठ्या नाल्यांमध्ये येतो. बहुतांश छोटे नाले अजून साफ केले नसल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत.