Join us
Daily Top 2Weekly Top 5

Electric Vehicles: मुंबईकरांना इलेक्ट्रिक वाहनांची भुरळ, गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 15:00 IST

Mumbai: इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई: इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढते प्रदूषण आणि पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यावर नागरिक भर देत आहेत. त्यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांमध्ये ४२ हजार ८८५ वाहनांची नोंदणी झाली असून, त्यात दुचाकीची संख्या जास्त आहे. राज्यात २०२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण लागू करण्यात आले होते. त्यावेळी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सबसिडी देण्यात येत होती. जुन्या धोरणानुसार राज्यात २०२५ पर्यंत एकूण नोंद झालेल्या वाहनांपैकी १० टक्के वाहने इलेक्ट्रिक असावीत, हे उद्दिष्ट जवळपास साध्य झाले आहे, असे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन धोरणानुसार आता २०३० पर्यंत दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या नोंदणीपैकी ४० टक्के, चारचाकी प्रवासी वाहनांपैकी ३० टक्के आणि शहरी भागातील सार्वजनिक फ्लिट ऑपरेटर्सना त्यांच्या ताफ्यात ५० टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रिक वाहने नोंदवण्याचे उद्दिष्ट आहे.

गेल्या काही वर्षांत राज्यातील प्रमुख शहरांत वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हवेचा दर्जा सुधारावा, यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. पेट्रोल, डिझेल आदी इंधनावरील वाहनांच्या धुरामधून मोठ्या प्रमाणात कार्बन मोनाक्साइड बाहेर पडतो, त्यामुळे हवेची पातळी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होते. ते रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे.

वाहनांसोबत चार्जिंग स्टेशनवर सबसिडी राज्यात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी लागू झाले आहे. त्यात इलेक्ट्रिक वाहनांसोबत चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीदेखील सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ५० ते २५० किलो व्हॅटपेक्षा (केव्ही) कमी क्षमतेच्या चार्जिंग स्टेशनला पाच लाखांपर्यंत, तर २५० ते ५०० केव्हीच्या चार्जिंग स्टेशनसाठी १० लाखांपर्यंत सूट मिळणार आहे.

५.६२ लाख ई-वाहने इलेक्ट्रिक वाहन खरेदीमध्ये देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक वाहने पुण्यामध्ये आहेत. सध्या राज्यात पाच लाख ६२ हजार इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. इलेक्ट्रिक वाहन पर्यावरणास अनुकूल आहे, तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत इंधन खर्च कमी आहे. 

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरमुंबईकार