३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 05:56 IST2025-09-05T05:55:22+5:302025-09-05T05:56:15+5:30
जय जवानचे प्रशिक्षक संदीप ढवळे व समिती सदस्य महेश सावंत यांनी पत्रपरिषदेत गिनिज बुकच्या घोषणेबाबत खंत व्यक्त केली

३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
मुंबई - दहीहंडीच्या दिवशी घाटकोपरमध्ये एक आणि ठाण्यात दोन, असे तीनवेळा १० थर लावले. ज्या पथकाला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र देण्यात आले, त्यांनी ठाण्यात १० थर लावले. थर उभे करताना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी नव्हते. असे असताना कोणत्या निकषांवर रेकॉर्डची घोषणा करण्यात आली, असा सवाल करत सार्वजनिकरीत्या प्रत्येक मंडळाला आवाहन करा. स्पर्धा ठेवा. स्पर्धेमध्ये क्षमता दाखविण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने गिनिज बुकला गुरुवारी केले.
जय जवानचे प्रशिक्षक संदीप ढवळे व समिती सदस्य महेश सावंत यांनी पत्रपरिषदेत गिनिज बुकच्या घोषणेबाबत खंत व्यक्त केली. ढवळे म्हणाले, १८ ऑगस्ट रोजी गिनिजचे भारतामधील प्रतिनिधी निखिल शुक्ला यांच्यासोबत संवाद साधला. तेव्हा आम्ही तुमच्याकडे दहा थरांबाबत कोणता प्रस्ताव आला आहे का? अशी विचारणा त्यांना केली. तेव्हा त्यांनी नाही म्हणून सांगितले. दहा थरांचा विश्वविक्रम कोणत्या निकषांच्या आधारावर दिला गेला आहे हा प्रश्न आहे. आम्ही तीन ठिकाणी दहा थर लावले. आम्हाला कोणत्याही पथकाला कमी लेखायचे नाही. न्याय हवा म्हणून बोलत आहोत. गिनिजचे प्रतिनिधी त्या दिवशी हजर असणे गरजेचे आहे. तरीसुद्धा हा रेकॉर्ड कोणत्या निकषांच्या आधारे दिला गेला हे समजले नाही, असेही ते म्हणाले.
कुठेतरी पाणी मुरतंय : २० तारखेला आम्ही संपर्क केला तेव्हा त्यांनी आठवड्याचा वेळ मागितला. आज ४ तारीख आहे. आम्हाला कुठे तरी पाणी मुरताना दिसते. कुठल्याच आयोजकाचा किंवा पथकाचा १० थरांसाठी प्रस्ताव आलेला नसताना अचानक मध्येच १० थरांचा रेकॉर्ड दिल्याने आम्ही संभ्रमात आहोत. आम्ही ज्या ज्या हंडीखाली १० थर लावले त्या आयोजकांनीही याचा पाठपुरावा केला पाहिजे. कारण हा रेकॉर्ड त्यांच्या हंडीखालीही आहे.