आतापर्यंत ३ हजार ५६९ कोटींचा महसूल जमा

By जयंत होवाळ | Published: April 24, 2024 08:19 PM2024-04-24T20:19:54+5:302024-04-24T20:20:02+5:30

पुढील ३० दिवसांत १०० टक्के मालमत्ताकर वसुलीसाठी पालिकेचे प्रयत्न

3 thousand 569 crores revenue till now bmc | आतापर्यंत ३ हजार ५६९ कोटींचा महसूल जमा

आतापर्यंत ३ हजार ५६९ कोटींचा महसूल जमा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : २५ मेपर्यंत मालमत्ता कर वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी मुंबई महापालिका आटोकाट प्रयत्न करत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये कर जमा करण्यासाठी पालिका प्रयत्नशील असून २३ एप्रिलपर्यंत ३ हजार ५६९ कोटी रूपयांच्या मालमत्ताकराचे संकलन झाले आहे. निर्धारित लक्ष्य ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण ७९ टक्के इतके आहे. एक महिन्याच्या कालावधीत १०० टक्के कर संकलन करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

महानगरपालिका हद्दीत एकूण मालमत्तांची संख्या ९ लाख ५५ हजार ३८ इतकी आहे. त्यापैकी ५०० चौरस फूट (४६.४५ चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱया निवासी इमारती / निवासी सदनिकांना संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. या मालमत्तांची संख्या ३ लाख ५६ हजार ६५२ आहे. एकंदरीत ५ लाख ९८ हजार ३८६ मालमत्ता कर आकारणी कक्षात येतात. मालमत्ता कराच्या उद्दिष्टपूर्तीसाठी करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

‘कर भरा, कारवाई टाळा’
अनेक मालमत्ताधारकांनी २५ मेपूर्वी कर भरण्याचे आश्वासन दिल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. एप्रिल आणि मे २०२४ मध्ये संकलित होणारा मालमत्ताकर हा सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षातील उद्दिष्टांचाच भाग आहे. अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.

‘टॉप टेन’ मालमत्ताधारक

बॉम्बे ऑक्सिजन लिमिटेड - (टी विभाग) - ६८ कोटी ८८ लाख १ हजार ७७८ रुपये (चार मालमत्ता)
अॅ रिस्टो शेल्टर प्रा. लि. (एम पूर्व विभाग) – २० कोटी ४१ लाख ६२ हजार ९ हजार ०७६ रुपये
मेसर्स फोरमोस्ट रिअॅलेटर्स प्रा लि.(एच पूर्व विभाग) – १५ कोटी ७५ लाख ७४ हजार २०७ रुपये
श्री साई गृप ऑफ कंपनीज (के पश्चिम विभाग) - १४ कोटी २२ लाख ८० हजार ८७४ रुपये
गौरव इन्वेस्टमेंट (जी दक्षिण विभाग) – १४ कोटी १६ लाख ३१ हजार ४८९ रुपये
मेसर्स पुरी कन्स्ट्रक्शन लि. (ए विभाग) – १३ कोटी ८३ लाख ९१ हजार ७४४ रुपये
स्नेहयोगी सहकारी गृहनिर्माण संस्था (एच पश्चिम विभाग) – १३ कोटी ७२ लाख ८२ हजार ०९९ रुपये
सुमेर कॉर्पोरेशन (एल विभाग) - १३ कोटी ०८ लाख ८३ हजार २२७ रुपये
लॅण्डमार्क डेव्हलपर्स (एफ दक्षिण विभाग) – १२ कोटी १२ लाख ७१ हजार ३०० रुपये
श्री साई पवन सहकारी गृहनिर्माण संस्था (के पश्चिम विभाग) - ८ कोटी ७३ लाख ३३ हजार १११ रुपये

Web Title: 3 thousand 569 crores revenue till now bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.