२४ वर्षीय मेंदूमृत मुलामुळे तिघांना मिळाले जीवनदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:38 IST2025-10-25T10:38:42+5:302025-10-25T10:38:55+5:30
या अवयवदानामुळे तीनजणांना जीवदान मिळाले आहे.

२४ वर्षीय मेंदूमृत मुलामुळे तिघांना मिळाले जीवनदान
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अवयवदानाबद्दल समाजात हळूहळू जनजागृती होत आहे. वसई येथे राहणारा सत्यम दुबे (वय २४) याला दुचाकी अपघातात जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत घोषित केले. रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सत्यम यांचे वडील संतोष दुबे यांना अवयवदानविषयी माहिती दिली.
त्यानुसार संतोष यांनी नातेवाइकांशी बोलून अवयवदानास संमती दिली. या अवयवदानामुळे तीनजणांना जीवदान मिळाले आहे. वसई येथील रिद्धी विनायक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात बुधवारी यकृत, दोन किडन्या, डोळे आणि उती, आदी अवयवदान करण्यात आले. हे मुंबई विभागातील ४५ वे मेंदूमृत अवयवदान झाले आहे. राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही.
‘माझा मुलगा अवयरूपी जिवंत’
अवयवदानाप्रकरणी संतोष दुबे यांनी सांगितले की, माझ्या मुलांच्या उपचारांदरम्यान डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत घोषित केले. मात्र, तरीही काही काळ वाट बघितली. त्यानंतर डॉक्टरांनी मला अवयवदानाविषयी माहिती दिली. त्यानंतर माझ्या नातेवाइकांशी चर्चा करून अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तो स्वतः नसला तरी अवयवरूपी जिवंत राहणार आहे.
अवयव निकामी झालेल्या रुग्णांत वाढ
गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत असल्याचे समाेर येत आहे.