Join us

एका दिवसात खात्यात जमा झाले ३.८१ कोटी; सायबर फसवणुकीतील त्रिकूट जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:23 IST

आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  सायबर गुन्ह्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सीबीआयने तीन सायबर भामट्यांना अटक केली आहे. त्यात सुधीर भास्कर पालांडे या बँक खातेधारकासह यश ठाकूर, शौर्य सुनीलकुमार सिंग या दलालांचा समावेश आहे. सीबीआयच्या मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, आणखी काही जणांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी मुंबईत उघडलेल्या एका बँक खात्यात सायबर फसवणुकीतील पीडित व्यक्तींची ३.८१ कोटीची रक्कम एकाच दिवशी जमा झाली होती. ही रक्कम पुढे देशभरातील शंभरहून अधिक बँक खात्यांमध्ये  वळवून मुख्य गुन्हेगारांपर्यंत पोहोचवण्यात आली. तपासात हे बँक खाते काही बँक कर्मचारी व दलालांनी बनावट केवायसी आणि कागदपत्रांच्या आधारे उघडल्याचे समोर आले.

अशी होती जबाबदारी

सीबीआयने कारवाईत मोबाइल, आयपॅडसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. यातील एकाने मुंबईत बँक खाते उघडले, तर इतर दोघांनी नागपूरमध्ये खोट्या खातेदारांची राहण्याची व्यवस्था केली आणि तिथून अन्य बँक खात्यांमध्ये पैसे वळवल्याचे तपासात उघड झाले. 

कमिशन क्रिप्टो करन्सीमध्ये

विशेष म्हणजे नागपूरमधील दलाल आणि बँक खातेधारकाने त्यांच्या कामाचे कमिशन क्रिप्टो करन्सीमध्ये स्वीकारून पुढे ती गुन्ह्यातील अन्य सहकाऱ्यांना वाटप केल्याचे समोर आले. याप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरू आहे.

 

टॅग्स :सायबर क्राइमगुन्हेगारी