वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे २९ टक्के काम पूर्ण; समुद्रातील स्पॅन उभारणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 06:18 IST2025-05-27T06:18:25+5:302025-05-27T06:18:33+5:30
२०२८ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन

वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे २९ टक्के काम पूर्ण; समुद्रातील स्पॅन उभारणी सुरू
अमर शैला
मुंबई : वांद्रे वर्सोवा सी लिंकचे २९ टक्के काम पूर्ण झाले असून, आता वर्सोवा बाजूनेही समुद्रातील मार्गावर स्पॅन उभारणीचे काम सुरू झाले आहे. पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाच्या कामाने आता गती घेतली आहे. त्यातून २०२८ मध्ये वांद्रे ते वर्सोवा हा प्रवासही जलद होऊ शकणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने १७.७ किमी लांबीच्या सी लिंकचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार सागरी मार्गावर एकूण ८ मार्गिका बांधल्या जातील. यातील मुख्य सागरी सेतू ९.६० किमी लांबीचा असून, तो समुद्रात ९०० मीटर आतमध्ये असेल. आता समुद्रात रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या कामांनी गती पकडली असून, आतापर्यंत कार्टर रोड बाजूने १२ स्पॅन उभारणीचे काम पूर्ण केले आहे. तर वर्सोवा बाजूने स्पॅन उभारणीला पंधरा दिवसांपूर्वी सुरुवात झाली असून, आतापर्यंत दोन स्पॅनची उभारणी पूर्ण झाली आहे.
पावसामुळे पुढील तीन महिने समुद्रातील काम थांबविले जाणार आहे. मात्र, त्याच वेळी वर्सोवा, कार्टर रोड आणि जुहू बाजूच्या कनेक्टरचे जमिनीवरील काम सुरू राहील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनामुळे रखडपट्टी
या प्रकल्पाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळी ऑगस्ट २०२५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे लागू झालेली टाळेबंदी आणि कंत्राटदार आर्थिक गर्तेत सापडल्याने या प्रकल्पाचे काम रखडले होते.
आता सर्व अडथळे दूर झाले असून, कामांनी गती पकडली आहे. मात्र, या प्रकल्पाला विलंब झाल्याने आता कामांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्प पूर्णत्वास आता मे २०२८ उजाडणार आहे.
वांद्रे किल्ला भागात नवा कनेक्टर
एमएसआरडीसी वांद्रे किल्ला भागात या सागरी सेतूला नवा कनेक्टर उभारणार आहे. त्यातून सागरी सेतूवरून आलेली वाहने थेट पाली हिल, बँड स्टँड आणि वांद्रे भागात जाऊ शकणार आहेत. त्यासाठी जवळपास १,८१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एमएसआरडीसीने त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारला पाठविला आहे. आता लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची चिन्हे आहेत.
९.६०
किमी सी लिंकच्या मुख्य सेतूची लांबी
१८,१२०
कोटी रु. प्रकल्पाचा खर्च
१७.७
किमी प्रकल्पाची एकूण लांबी