तोट्यातील ‘एसटी’ला २७० कोटींचे बुस्ट, गृह विभागाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 04:58 IST2020-06-22T04:58:52+5:302020-06-22T04:58:56+5:30
गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारकडे प्रलंबित असलेली २७० कोटींची थकबाकी महामंडळाला लवकरच मिळणार आहे.

तोट्यातील ‘एसटी’ला २७० कोटींचे बुस्ट, गृह विभागाचे आदेश
मुंबई : कोरोनामुळे तोट्यातील एसटीचे चाक आणखी तोट्यात रुतलेले असताना राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला काहीसा दिलासा देणारी एक बाब आहे. कारण गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारकडे प्रलंबित असलेली २७० कोटींची थकबाकी महामंडळाला लवकरच मिळणार आहे.
टाळेबंदीनंतर राज्यातील परिवहन सेवा जवळपास बंदच आहे. प्रवासासाठी घातलेल्या विविध अटींमुळे नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे प्रवाशांअभावी बहुतांश बस स्थानकातच थांबून आहेत. त्यामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाला प्रलंबित थकबाकी मिळाल्याने थोडा दिलासा मिळणार आहे. गृह विभागाने त्याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. महामंडळातर्फे प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. त्याची रक्कम सरकारकडून दिली जाते. गेल्या आर्थिक वर्षातील थकबाकी देण्यासाठी महामंडळाकडून पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या वर्षाच्या आर्थिक तरतुदीतून ही रक्कम वर्ग करण्याला गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
>गेल्या आर्थिक वर्षामध्ये विविध प्रकारच्या प्रवाशांना एसटी महामंडळाने दिलेल्या सवलतींपैकी २७० कोटींची रक्कम अद्याप मिळालेली नव्हती. त्यासाठी गृह विभागाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी तरतूद केलेल्या रकमेतून २७० कोटी एसटीला थकबाकीच्या बदल्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.