मुंबईकरांसाठी येणार २६८ एसी रेल्वे; मेट्रोप्रमाणेच बंद दरवाज्याच्या गाड्यांनी होणार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:14 IST2025-08-20T12:14:28+5:302025-08-20T12:14:46+5:30

महामुंबईतील वाहतूक, पायाभूत सुविधांसाठी मेगा निर्णय

268 AC trains to come for Mumbaikars; Travel will be done in closed-door trains like Metro | मुंबईकरांसाठी येणार २६८ एसी रेल्वे; मेट्रोप्रमाणेच बंद दरवाज्याच्या गाड्यांनी होणार प्रवास

मुंबईकरांसाठी येणार २६८ एसी रेल्वे; मेट्रोप्रमाणेच बंद दरवाज्याच्या गाड्यांनी होणार प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील वाहतूक आणि शहरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे अनेक निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत घेण्यात आले. मुंबईसह राज्यातील पाच मोठी शहरे आणि परिसराला त्याचा मोठा फायदा होणार आहे.

उपनगरीय रेल्वे सेवेत आधुनिकता आणण्यासाठीही मुंबई महानगर प्रदेश विकास योजनेच्या (एमयूटीपी) टप्पा ३ व ३ एअंतर्गत नवीन गाड्यांची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात २६८ पूर्ण एसी गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. या गाड्या मेट्रोप्रमाणेच बंद दरवाज्याच्या, उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांनी सज्ज असतील. जुन्या विना-दरवाजाच्या गाड्यांना टप्प्याटप्प्याने हटवून त्याऐवजी या आधुनिक गाड्या सेवेत आणल्या जातील. विशेष म्हणजे तिकीट दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेशकुमार तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मेट्रो ११ प्रकल्पाला हिरवा कंदील

मुंबईत मेट्रो मार्गिका ११ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. वडाळा डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या १६ किलोमीटरच्या पूर्ण भूमिगत मार्गिकेची उभारणी करण्यात येणार आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक आणि हॉर्निमल सर्कल अशा महत्त्वाच्या ठिकाणांवरून ही मेट्रो धावेल. जवळपास २४ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, जपानी आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेकडून (जायका) यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. 

आजच्या निर्णयांमुळे मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या शहरांना आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि विकासाची नवी दिशा व गती मिळेल.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

नवी मुंबई विमानतळापर्यंत  २५ किमीचा एलिव्हेटेड रोड

ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान २५ किमीचा एलिव्हेटेड रोड उभारण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मधल्या औद्योगिक क्षेत्रांना वेगवान दळणवळण मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच बेस्टसोबत संयुक्त विकास प्रकल्पांतर्गत व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारला जाणार आहे. त्यातून बेस्टला अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

Web Title: 268 AC trains to come for Mumbaikars; Travel will be done in closed-door trains like Metro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.