लाडकी बहीण योजनेत २६.३४ लाख जण अपात्र; जूनपासूनचा लाभ स्थगित: अदिती तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 09:47 IST2025-07-28T09:46:49+5:302025-07-28T09:47:53+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

26 lakh 34 thousand people ineligible for ladki bahin yojana and the benefits suspended from june said aditi tatkare | लाडकी बहीण योजनेत २६.३४ लाख जण अपात्र; जूनपासूनचा लाभ स्थगित: अदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेत २६.३४ लाख जण अपात्र; जूनपासूनचा लाभ स्थगित: अदिती तटकरे

लोकमत न्यूज  नेटवर्क, मुंबई  :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानाही लाभ घेत असल्याची माहिती सादर केली. या अपात्र लाभार्थींना जूनपासून लाभ स्थगित करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

अपात्र लाभार्थींमध्ये पुरुषही असून त्यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने नुकतेच प्रसिद्ध केले. २६.३४ लाख अपात्र पैकी काही एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या. या आधारे जून २०२५ पासून या २६.३४ लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला. याव्यतिरिक्त पात्र असलेल्या २.२५ कोटी  लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला असल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

जे पात्र त्यांनाच लाभ
 
तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६.३४ लाख एवढ्या लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई, निर्णय लवकरच  

शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असेही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title: 26 lakh 34 thousand people ineligible for ladki bahin yojana and the benefits suspended from june said aditi tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.