लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: चालू वर्षात ‘बेस्ट’च्या ताफ्यात दोन ते अडीच हजार नवीन बस दाखल होणार आहेत. त्यापैकी १,५०० बस केंद्र सरकारच्या उपक्रमातून, तर उर्वरित बस काही कंत्राटदारांकडून उपलब्ध होतील, अशी माहिती महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लवकरच थांबेल, अशी अपेक्षा आहे.
सध्या बेस्टच्या ताफ्यात स्वत:च्या आणि कंत्राटी (भाडेतत्त्वावरील) अशा एकूण दोन हजार ७०० बस आहेत. मात्र, प्रवाशांच्या तुलनेत हा ताफा अपुरा पडत आहे. परिणामी प्रवाशांना तासन्तास बसची वाट पाहत उभे राहावे लागते. ‘बेस्ट’ने बसच्या पुरवठ्यासाठी विविध कंपन्यांना कंत्राटे दिली आहेत. मात्र, त्यांच्याकडून वेळेत बस उपलब्ध होत नसल्याच्याही तक्रारी आहेत. दरम्यान, अशा कंत्राटदार कंपन्यांवर कारवाई न करता व्यवस्थापन त्यांना पाठीशी घालत असल्याचा दावा बेस्ट संघटना करत आहेत.
सात हजार बसचे उद्दिष्ट
२०२६-२७ या वर्षात ईव्ही ट्रान्स, स्विच मोबॅलिटी, पीएमआय इलेक्ट्रो मोबॅलिटी या कंत्राटदारांकडून इलेक्ट्रिक बस मिळणे अपेक्षित आहे. यामुळे बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या ताफ्यात वाढ होऊन ही संख्या साडेतीन हजारांहून अधिक जाण्याची शक्यता आहे. बेस्ट बसच्या ताफ्यात पाच हजारांहून अधिक बस उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. दरम्यान, ‘बेस्ट’चा ताफा ७ हजारापर्यंत नेण्याचा उपक्रमाचा मानस आहे.
‘त्या’ कराराचे काय झाले?
सध्या ‘बेस्ट’च्या स्वत:च्या २४८ बस सेवेत आहेत. स्वमालकीच्या किमान तीन हजार बसचा ताफा राखला जावा यासाठी उपक्रमाने करार केला होता, त्याचे काय झाले, असा प्रश्न बेस्ट घटनांकडून विचारला जात आहे.
केंद्राकडून १,५०० वाहने
या ताफ्यातील १,५०० बस उपक्रमाला केंद्र सरकारच्या पीएम ई-ड्राइव्ह अभियानांतर्गत मिळणार आहेत. यासाठी ‘बेस्ट’कडून आवश्यक प्रक्रियाही राबवण्यात आली आहे.
‘बेस्ट’ ताफ्यात तीन हजार बसही नाहीत. यंदा जर खर्च अडीच हजार बसची भर पडणार असेल तर मुंबईकरांसाठी हा सुखद धक्का असणार आहे. बेस्टने किमान प्रवाशांना सुरक्षित आणि खिशाला परवडणारा प्रवास द्यावा, ही अपेक्षा आहे.-लीना शेवाळे, बेस्ट प्रवासी
Web Summary : Mumbai's BEST will add 2,500 buses this year, including 1,500 from a central scheme. This aims to alleviate passenger inconvenience. BEST targets 7,000 buses by 2027, expanding its electric fleet. Commuters hope for affordable, safe travel.
Web Summary : मुंबई की बेस्ट में इस साल 2,500 बसें जुड़ेंगी, जिनमें 1,500 केंद्र सरकार की योजना से हैं। इससे यात्रियों को होने वाली असुविधा कम होगी। बेस्ट का लक्ष्य 2027 तक 7,000 बसें करना और इलेक्ट्रिक बेड़े का विस्तार करना है। यात्रियों को किफायती और सुरक्षित यात्रा की उम्मीद है।