Join us

चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 06:13 IST

-चंद्रकांत दडस, मुंबई देशभरातील २.५ टक्के महिलांच्या (किमान ६ लाख महिला) प्रसूती कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून किंवा वैद्यकीय मदतीशिवाय ...

-चंद्रकांत दडस, मुंबई देशभरातील २.५ टक्के महिलांच्या (किमान ६ लाख महिला) प्रसूती कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून किंवा वैद्यकीय मदतीशिवाय होत असल्याचे समोर आले आहे. भारताच्या रजिस्ट्रार जनरलच्या २०२३ च्या नमुना नोंदणी प्रणाली (एसआरएस) अहवालानुसार,  कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिला किंवा इतरांकरून प्रसूती करून घेण्याचे प्रमाण ग्रामीण भागात २.३ टक्के असून, शहरात हे प्रमाण १.१ टक्के इतके आहे. तर कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय प्रसूतीचे प्रमाण ग्रामीण भागात ०.७ तर शहरात ०.१ टक्के इतके आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती? 

महाराष्ट्रातील १.४ टक्के महिलांची प्रसूती कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून होत आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण अधिक आहे. 

०.३ टक्के महिलांची प्रसूती कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून ग्रामीण भागात होत असून, शहरात हे प्रमाण २.८ टक्के इतके अधिक आहे. कोणत्याही वैद्यकीय मदतीशिवाय प्रसूतीचे प्रमाण महाराष्ट्रात शून्य आहे हे विशेष.

सरकारी रुग्णालयांवर ग्रामीण भागाचा विश्वास

अहवालानुसार, भारतात एकूण ७१.५ टक्के प्रसूती सरकारी रुग्णालयांत झाल्या, तर २३.४ टक्के खासगी रुग्णालयांत झाल्या.

उर्वरित २.७ टक्के प्रसूती पात्र डॉक्टरांकडे तर २ टक्के अशिक्षित महिलांकडे झाल्या आहेत. ग्रामीण भागात ७६.४ टक्के प्रसूती सरकारी रुग्णालयांत, तर शहरी भागात ५६.७ टक्के प्रसूती सरकारी रुग्णालयांत झाल्या आहेत.

उलटपक्षी, खासगी रुग्णालयांत शहरी भागातील ४०.६ टक्के प्रसूती झाल्या, तर ग्रामीण भागात हा आकडा केवळ १७.७ टक्के होता.

मातामृत्यू व बालमृत्यूचे धोके अधिक

महाराष्ट्रात जवळपास अर्ध्या (४८.५%) महिलांची प्रसूती खासगी रुग्णालयांत होत आहे. हा आकडा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. 

ग्रामीण भागात सरकारी रुग्णालये पसंत केली जात आहे. देशभरात एकूण २.७% महिला फक्त पात्र डॉक्टरांकडे (रुग्णालयाबाहेर) प्रसूती करत आहेत. महाराष्ट्रात हे प्रमाण ०.७% आहे.

तर बिहारमध्ये अजूनही ७.५% महिलांची प्रसूती कोणतेही प्रशिक्षण नसलेल्या महिलांकडून होत आहे. देशात हे प्रमाण सर्वाधिक असून, त्यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे धोके वाढण्याची भीती व्यक्त केली जाते.

टॅग्स :आरोग्यप्रेग्नंसीडॉक्टरहॉस्पिटल