‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 05:17 IST2025-07-04T05:15:45+5:302025-07-04T05:17:08+5:30
सरपंच म्हणून गावच्या विकासासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील सरपंचांचा मुंबईत गौरव

‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
मुंबई : लोकमत समूहातर्फे राज्यातील २४ जिल्ह्यांतून निवडलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले, या पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाख रुपये विकास निधी देण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी केली. तेव्हा उपस्थित सर्व ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करत आनंद व्यक्त केला.
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ पुरस्काराचे हे चाैथे वर्षे हाेते. हा सोहळा गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात संपन्न झाला. लाेकमतचे एडिटर इन चीफ माजी उद्याेग व शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री गोरे, कृषिमंत्री माणिकराव काेकाटे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे, ग्रामविकास राज्यमंत्री याेगेश कदम यांची उपस्थित होते.
तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांनी लाेकमत सरपंच पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाखांचा निधी देण्याची परंपरा सुरु केली, असे सांगून लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले, आपण आता ग्रामविकास मंत्री आहात. ही परंपरा आपण खंडित होऊ देऊ नका असे आवाहन केले हाेते. ताेच धागा पकडत मंत्री जयकुमार गाेरे यांनी कुणाच्याही कोट्याला धक्का न लावता या स्पर्धेतील सर्व १३ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याची घोषणा करतो आणि त्यावर प्रत्यक्ष कृती होईल याचीही खात्री आपल्याला देतो, असे स्पष्ट केले. विजेत्या सरपंचांना स्टेजवर सन्मानाने बसवून फेटे बांधले जात होते. त्यानंतर त्यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार केला जात होता. सत्काराच्या वेळी उपस्थित प्रेक्षक आपापल्या सरपंचांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते.
सरपंच निधीचा याेग्य वापर करतील
‘आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून अनेक कामे करतो. एखाद्या ठिकाणी ५ कोटींचा रस्ता झाला तरी आम्हाला ५ मते मिळतील का, याबाबत शंका असते. मात्र गावखेड्यातील एखाद्या गावात ५ लाखांचा रस्ता केला तरी लोक ते लक्षात ठेवतात. त्यामुळे २५ लाख विकास निधी देण्याची योजना लोकप्रिय आहे. जो जमिनीवर काम करतो, त्याला ३-५ लाखाची किंमत काय ते कळते. निवड केलेले सरपंच निधीचा उपयाेग करतील.
जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री
१३ ग्रामपंचायतींत 'स्मार्ट अंगणवाडी'
सर्व १३ पुरस्कार प्राप्त सरपंचांच्या गावासाठी ग्रामविकास मंत्र्यांनी २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मी माझ्या विभागाच्यावतीने पुरस्कारप्राप्त १३ सरपंचांच्या गावातील अंगणवाड्यांना 'स्मार्ट अंगणवाडी' करण्याची घोषणा करते.
अदिती तटकरे, महिला, बालकल्याण मंत्री
पालकमंत्री काेकाटे
यांनी दिले ५० लाख
आपण ज्या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आहाेत त्या जिल्ह्यातल्या कात्री गावाला आज पुरस्कार मिळाला आहे. त्यांना मी ५० लाख रुपये अधिकचा निधी देण्याची घाेषणा करताे. सर्व विजेत्या सरपंचांसह कात्री गावाच्या सरपंचाचेही विशेष अभिनंदनही करताे.
माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री
सरपंचांची जबाबदारी आणखी वाढली
सरपंच हा गावाचा कणा आहे, ‘लोकमत’ सरपंच अवाॅर्ड मिळाल्याने पुरस्कार विजेत्या सरपंचांच्या जबाबदारीत आणखी वाढ झाली आहे. त्याला साजेसे काम करत राहण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने नेहमीच राज्यकर्त्यांना दिशा देण्याचे काम केले आहे.
बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री
घरचे दागिने गहाण ठेवणारे सरपंच
गावाच्या विकासासाठी घरातील दागिने गहाण ठेवलेले सरपंच आम्ही पाहिले आहेत. राजकारणात तरुणाची संख्या वाढतेय ही चांगली
बाब आहे. ‘लोकमत’चा मिळालेला पुरस्कार विकत मिळत नाही. सरपंच सातत्याने २४ तास गावाच्या सेवेत असतात.
योगेश कदम,ग्रामविकास राज्यमंत्री