२५ लाखांवर विद्यार्थी देणार नीट-यूजी परीक्षा; आजवरची सर्वाधिक नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 06:36 AM2024-03-10T06:36:04+5:302024-03-10T06:37:15+5:30

ही आजवरची सर्वाधिक नोंदणी आहे. 

25 lakh students will take neet ug exam highest registration ever | २५ लाखांवर विद्यार्थी देणार नीट-यूजी परीक्षा; आजवरची सर्वाधिक नोंदणी

२५ लाखांवर विद्यार्थी देणार नीट-यूजी परीक्षा; आजवरची सर्वाधिक नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता देशपातळीवर होणाऱ्या नीट-यूजी या परीक्षेकरिता २५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही आजवरची सर्वाधिक नोंदणी आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशपातळीवर सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट ही एकमेव परीक्षा होते. त्यामुळे या परीक्षेला सर्वांत जास्त विद्यार्थी बसतात. यंदा तर विद्यार्थी नोंदणीने आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत. शनिवार हा नीट-यूजीच्या नोंदणीसाठी शेवटचा दिवस होता. ‘’नॅशनल टेस्टिंग एजन्सी’’द्वारे ५ मे रोजी ही परीक्षा होणार आहे. आतापर्यंत देशभरातून २५ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २०२३ च्या नोंदणीपेक्षा हा आकडा चार लाख २० हजारांनी वाढला आहे. विद्यार्थी अजूनही अर्ज भरत आहेत. तांत्रिक कारणांमुळे अनेकांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे नोंदणीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत आहे.

१ लाख ९ हजार एमबीबीएस जागा

युनानी, होमिओपॅथी, पशुवैद्यकीय, आयुर्वेद आणि नर्सिंगच्या जागांसह एक लाख नऊ हजार एमबीबीएसच्या आणि सुमारे २६ हजार डेंटलच्या अशा जवळपास दोन लाख जागांकरिता ही प्रवेश परीक्षा होते आहे.

अडचणी काय?

अनेक मुलांना आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक लिंक करता आला नसल्याने अर्ज करता आले नाहीत. काही विद्यार्थ्यांना मोबाइल नंबर बदलल्याने ओटीपी मिळाले नाहीत. त्यांच्याकडे पॅन कार्डचा पर्याय नसल्याने ओटीपी मिळण्यात अडचणी येत आहेत.

५५ टक्के मुली

नीटकरिता १३ लाखांहून अधिक मुलींनी नोंदणी केली आहे. हे प्रमाण ५५ टक्क्यांहून अधिक आहे.

नीट-यूजीची आजवरची नोंदणी (वर्षनिहाय)

२०१३     ७.१७ लाख
२०१४     ५.७९ लाख
२०१५     ३.७४ लाख
२०१६     ८.०२ लाख
२०१७     ११.३७ लाख
२०१८     १३.२६ लाख
२०१९     १५.१९ लाख
२०२०     १५.९७ लाख
२०२१     १६.१४ लाख
२०२२     १८.७२ लाख
२०२३     २०.८७ लाख

 

Web Title: 25 lakh students will take neet ug exam highest registration ever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.