मुंबईच्या काही भागांवर २५ कोटींची मेहरनजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 05:58 IST2022-12-14T05:57:58+5:302022-12-14T05:58:06+5:30
जी-२० परिषदेच्या निमित्ताने परदेशातून विविध संस्थेचे प्रतिनिधी मुंबईत येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी पालिकेने विविध विकासकामे हाती घेतली आहेत.

मुंबईच्या काही भागांवर २५ कोटींची मेहरनजर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेकडून शहरातील विकासकामे करताना न्यायालयातील प्रलंबित खटले, निधीची मंजुरी असे तुणतुणे नेहमीच वाजवले जाते. रस्त्यांवरील खड्डे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण याबाबत सातत्याने तक्रारी येत असतात. परंतु, मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या जी-२० बैठकीनिमित्त पालिकेला या कारणांचा नेमका विसर पडलेला दिसत आहे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने मुंबईत जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांवर छाप पाडण्यासाठी पालिकेने २५ कोटींचा निधी तत्काळ मंजूर केला असून, खड्डेमुक्त रस्ते व सुशोभीकरणासाठी हा निधी खर्च करण्यात आला आहे. ही चपळाई पाहता विकासकामांत प्रशासनाने अशीच तत्परता यापुढेही दाखवून द्यावी, अशी आशा मुंबईकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
जी-२० परिषदेच्या निमित्ताने परदेशातून विविध संस्थेचे प्रतिनिधी मुंबईत येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी पालिकेने विविध विकासकामे हाती घेतली आहेत. त्यासाठी पालिकेने मुंबईच्या सुशोभीकरणासाठी २५ कोटी रुपयांचा निधी झटपट मंजूर केला. विमानतळ ते कुलाबा, ताज हॉटेल आणि ट्रायडंट परिसरासह मुंबईतील अन्य भागात शोभिवंत झाडे लावण्यात आली आहेत.
रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर या क्षेत्रातील फेरीवाल्यांना हटवण्यात आले असून, परिसर चकाचक करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांनी पालिकेची ही लगबग पाहता मुंबईच्या इतर परिसरातही कामात अशीच तत्परता दाखवण्याची मागणी केली आहे.
हे रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद
छत्रपती शिवाजी महाराज मार्गापासून ते पुढे रिगल सिनेमापर्यंतचा रस्ता.
बेहराम रोड जंक्शन आणि महाकवी भूषण मार्ग जंक्शन वाहतुकीसाठी बंद असेल.
हे रस्ते असतील बंद
मंडलिक रस्ता ते बोमन बेहराम रोड
शहीद भगत सिंग मार्ग ते महाकवी भूषण मार्ग जंक्शन
बॉम्बे प्रेसिडेन्सी क्लब (रेडीयो क्बल) ते ॲडम स्ट्रिट जंक्शन
नेहरू रोडकडून हॉटेल ॲण्ड हयातकडे जाणारा रस्ता (वाकोला पाइपलाइन रोड) सर्व वाहनांकरिता (आपत्कालीन सेवा वाहने वगळून)
हॉटेल ॲण्ड हयातकडून सीएसएमटीकडे जाणारा जुना रस्ता सर्व वाहनांकरिता.
पटुक महाविद्यालय जंक्शनकडून हॉटेल ग्रॅण्ड हयातकडे जाणारा रस्ता (छत्रपती शिवाजीनगर रोड) सर्व वाहनांकरिता.