नोकऱ्या द्या हो! महाराष्ट्रातील २४.५१ लाख जणांनी केली नोंदणी; केंद्र सरकारच्या पोर्टलवर लोंढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:50 IST2025-01-28T08:49:23+5:302025-01-28T08:50:22+5:30
महाराष्ट्रातील या साडे चोवीस लाख जणांमध्ये ७ लाख ७७ हजार लोक हे १२ वी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले आहेत.

नोकऱ्या द्या हो! महाराष्ट्रातील २४.५१ लाख जणांनी केली नोंदणी; केंद्र सरकारच्या पोर्टलवर लोंढा
पवन देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यात आयटीच्या जॉबसाठी लागलेल्या रांगेनंतर बेरोजगारासंदर्भात चर्चा जोरात सुरू झाली असून, राज्यातील २४ लाख ५१ हजार लोकांनी नोकरीसाठी सरकारी पोर्टलवर नोंदणी केल्याचा डेटा समोर आला आहे.
केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा या पोर्टलवर महाराष्ट्रातील लोकांनी नोकरीसाठी केलेल्या अर्जाची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार जळगाव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, नाशिक, नांदेड आणि अमरावती या जिल्ह्यांतील नोकरी मिळवण्यासाठी नोंद केलेल्यांची संख्या १ लाखाच्या पुढे आहे.
एआयमुळे आयटी सेक्टरमधील जॉब जात असल्याची ओरड होत असतानाच महाराष्ट्रीतील दीड लाखांहून अधिक जणांनी या क्षेत्रात नोकरीसाठी नोंद केली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशात २ कोटी ३९ लाख लोकांनी रोजगारासाठी नोंद केल्याचे सरकारी पोर्टलवर दिसते. त्यात महाराष्ट्रातील संख्या १९.०४ लाखांवर होती. डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील ही रोजगारइच्छुकांची संख्या वाढून २४.५१ लाखांवर गेली आहे. त्यातही सर्वाधिक नोंदणी एकट्या ऑक्टोबर महिन्यात झालेली दिसते.
महाराष्ट्रातील या साडे चोवीस लाख जणांमध्ये ७ लाख ७७ हजार लोक हे १२ वी किंवा त्याहून अधिक शिक्षण घेतलेले आहेत. २ लाखांहून अधिक जणांनी पदवी तर ३८ हजार जणांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. राज्यात एप्रिल ते नोव्हेंबर या काळात १ हजार १३ रोजगार मेळावे घेण्यात आले.
एम्प्लॉयरही सर्वाधिक पण..
राज्यातील १४ लाख नोकऱ्यांसाठी कंपन्यांनी या पोर्टलवर नोंदणी केली होती. नोकरी देणाऱ्या कंपन्या, व्यवसायांनी, छोट्या उद्योगांनी या पोर्टलवर नोंदणी करण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे.
१७ टक्के एम्प्लॉयर राज्यातील आहे. मात्र, तरीही राज्यात २४ लाखांवर तरुणांना नोकरी हवी आहे, असे या आकडेवारीवरून दिसते.
नोंदणी केलेल्यांमध्ये कोण किती शिकलेले?
शैक्षणिक पात्रता - नोंदणी संख्या
९ वी पर्यंत - १२,६३,८७८
१० वी - ४,६३,३०२
१२ वी - ४,५८,६०५
पदवीधर - २,३१,४४३
पदव्युत्तर - ३८,५०७
१० वी नंतर डिप्लोमा - ३८,२८०
आयटीआय - ५,८३६
१२ वी नंतर डिप्लोमा - ४,४८३
पीजी डिप्लोमा - ३६०
पीएचडी - १७७