मुंबई - मुंबई महापालिकेच्या सभागृहात महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची बुधवारी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित २२७ सदस्य, महापलिका सचिव विभागाचे कामकाज हाताळणारे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मात्र, या सभागृहाची जागा अपुरी पडल्याने यावेळी प्रचंड गोंधळ झाला.
काँग्रेसच्या सदस्यांनी तर बसण्यास जागा न मिळाल्याने जमिनीवर ठाण मांडत निषेध नोंदवला. लवकरच २२७ सदस्यांमध्ये आणखी १० स्वीकृत नगरसेवकांची भर पडणार असल्याने जागेची अडचण आणखी तीव्र होणार आहे. सभागृहातील जागेची अडचण दूर व्हावी यासाठी नवी मुंबई महापालिकेप्रमाणेच मुंबई महापालिकेचे सभागृह असावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. पण, त्याची अंमलबजावणी न झाल्याने बुधवारी पेच निर्माण झाला.
मुंबई महापालिका १८७२ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर तिची पहिली सभा ४ सप्टेंबर १८७३ रोजी भरली. त्यावेळी नगरसेवकांची संख्या ६४ होती. त्यानंतर २००२ पर्यंत त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत ती २२७ इतकी झाली. मात्र सभागृह तेच राहिले. नगरसेवकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिका प्रशासनाने नवीन सभागृहाची निर्मिती करणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांना बसण्यासाठी बुधवारी पुरेशी जागा उपलब्ध झाली नाही. सध्याच्या सभागृहात वाढत असलेल्या राजकीय गोंधळामुळे याचा परिणाम थेट सभागृहाच्या कामकाजावरही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पर्यायी व्यवस्था काय? महापालिका मुख्यालयाला लागून राज्य उत्पादन शुल्क विभागाची जागा होती. येथेही सभागृह बांधण्यासंदर्भात चर्चा झाली होती. मात्र महापालिकेने कोणतीही पावले न उचलल्यामुळे या यापूर्वी जागेवर उत्पादन शुल्कची इमारत उभी राहिली. या शिवाय महापालिका मुख्यालयासमोरील क्रीडा भवन जागेवर महापालिका पर्यायी सभागृह उभारण्याचा विचार केला जाऊ शकतो. हे ठिकाण महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे नगरसेवक व प्रशासनालाही सोयीचे झाले असते. सध्या क्रीडा भवनाच्या इमारतीचा पुनर्विकास करून तेथे अत्याधुनिक टाऊन हॉल व कॅफे उभारण्यात येणार आहे.
महापालिकेच्या हेरिटेज इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ६८ फूट लांब, ३२ फूट रुंद आणि ३८ फूट उंचीचे सभागृह आहे. सभागृहात दोन प्रेक्षक दालने असून, प्रत्येकी १३ दिवे बसवलेली ३ झुंबरे आहेत. सभागृहाच्या छताची आणि एकंदरित सभागृहाची सजावट आणि कलाकुसर एखाद्या राजवाड्यासारखी आहे. सभागृहातील गोलाकार आणि त्रिकोणाकृती खिडक्या आणि दारे रेखीव असून, कमानीवर कोरीव काम आहे. यात विविध पक्षांची व प्राण्यांची सुबक शिल्पे कोरलेली आहेत. सभागृहात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डोसाभाई कराडा, महात्मा फुले, रावसाहेब विश्वनाथ मंडलिक, सर भालचंद्र भाटवडेकर, दादाभाई नौरोजी, अशा १३ मान्यवरांचे पुतळे आहेत.
किशोरी पेडणेकर यांचा प्रस्ताव पुरेशा जागेअभावी झालेल्या गोंधळाची दखल महापौरांनी घ्यावी, अशी मागणी उद्धवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. दाटीवाटीने बसल्यामुळे नगरसेवकांना आरोग्याचा त्रास होईलच शिवाय कामकाजावर ही परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. यासंबंधी क्रीडा भवनात पर्यायी सभागृह उभारण्याचा प्रस्ताव लवकरच त्या देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Web Summary : Mumbai's municipal hall lacks space for its 227 councilors, causing chaos. Congress members protested, demanding a new hall like Navi Mumbai's. A sports complex is considered as an alternative location. The current heritage hall is historically significant, but insufficient.
Web Summary : मुंबई नगर निगम में 227 पार्षदों के लिए जगह कम होने से अराजकता। कांग्रेस सदस्यों ने नवी मुंबई जैसे नए हॉल की मांग करते हुए विरोध प्रदर्शन किया। खेल परिसर एक वैकल्पिक स्थान के रूप में विचाराधीन है। वर्तमान विरासत हॉल ऐतिहासिक है, लेकिन अपर्याप्त।