Join us
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अनाथाश्रमात २२ जण कोरोनाबाधित; १५ विद्यार्थ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 07:47 IST

सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन कर्मचाऱ्यांचा कोविड चाचणी अहवाल २३ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्याने पालिकेच्या ई विभाग कार्यालयामार्फत या अनाथाश्रमातील ९५ जणांची २४ ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यापैकी २२ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील निवासी संकुलात १७ रहिवासी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आता आग्रीपाडा येथील एका अनाथाश्रमात २२ जणांना संसर्ग झाला आहे. यात १८ वर्षांखालील १५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व बाधितांवर पालिका रुग्णालय आणि कोविड केंद्रात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र खबरदारीसाठी महापालिकेने हे अनाथाश्रम सील केले आहेत. 

सेंट जोसेफ शाळा आणि अनाथाश्रमातील दोन कर्मचाऱ्यांचा कोविड चाचणी अहवाल २३ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्याने पालिकेच्या ई विभाग कार्यालयामार्फत या अनाथाश्रमातील ९५ जणांची २४ ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यापैकी २२ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले.

बारा वर्षांखालील चार विद्यार्थी कोरोनाबाधितअनाथाश्रमातील २२ कोरोनाबाधितांपैकी चार विद्यार्थी १२ वर्षांखालील आहेत. त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत; तर १२ ते १८ वयोगटातील १८ बाधित आढळले आहेत. या सर्वांना भायखळा येथील रिचर्ड्स अँड क्रूडास कोविड केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये सात कर्मचाऱ्यांचाही समावेश असून, सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे.

अनाथाश्रम सील; पाच दिवसांनी पुन्हा चाचणीएवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळल्याने महापालिकेने खबरदारीसाठी अनाथाश्रम सील केले आहे. नियमानुसार १४ दिवस या अनाथाश्रमात प्रवेश प्रतिबंधित असणार आहे. तसेेच पाच दिवसांनंतर पुन्हा सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी केली जाणार असल्याचे ई विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त मनीष वाळुंजे यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस