१,८४६ लिपिक पदांसाठी अर्ज आले २,०६,५८२; मुंबई पालिकेतील भरतीला उदंड प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:29 IST2024-10-16T14:29:34+5:302024-10-16T14:29:50+5:30
कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दोन टप्प्यांत अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवार पहिल्या प्रयत्नात टप्प्यात पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, अशी अट घालण्यात आली होती.

१,८४६ लिपिक पदांसाठी अर्ज आले २,०६,५८२; मुंबई पालिकेतील भरतीला उदंड प्रतिसाद
मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या एक हजार ८४६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, या पदांसाठी आतापर्यंत दोन लाख सहा हजार ५८२ अर्ज प्राप्त आहेत. त्यापैकी परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण एक लाख ११ हजार ३५८ इतकी आहे.
कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी दोन टप्प्यांत अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवार पहिल्या प्रयत्नात टप्प्यात पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात पदवी उत्तीर्ण होऊ न शकलेल्या असंख्य उमेदवारांची संधी हुकली होती. ही अट रद्द करावी, अशी मागणी कामगार संघटनांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, सुरुवातीला या मागणीची दखल घेण्यात आली नव्हती. उद्धवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनीदेखील अट रद्द करण्याची मागणी केली होती.
काही दिवसांतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पालिका आयुक्तांना पत्र लिहून अट रद्द करण्याची सूचना केली होती. त्यानंतर प्रशासनाने अट रद्द केली आणि पहिल्या प्रयत्नात पदवी परीक्षा उत्तीर्ण न करू शकलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची मुभा दिली. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात पुन्हा भरतीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली.
२० ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान अर्हता शिथिल केल्यानंतर २१ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते.
एक लाख
११ हजार उमेदवारांनी भरले परीक्षा शुल्क
- ९ सप्टेंबरपर्यंत एकूण एक लाख ५७ हजार ६३८ उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ७३ हजार ९१८ उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले आहे.
- सुधारित जाहिरातीनुसार ११ ऑक्टोबरपर्यंत ४८ हजार ९४४ उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ३७ हजार ४४० उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरलेले आहे.
- दोन्ही टप्प्यांत मिळून एकूण दोन लाख सहा हजार ५८२ अर्ज प्राप्त झाले असून, परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण एक लाख ११ हजार ३५८ इतकी आहे.