Join us

महादेव ॲपचा पुरावा मिळू नये, म्हणून २००० ऑपरेटर; हायफाय तंत्रज्ञान, कोट्यवधींची फिरवाफिरवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 06:30 IST

असा होत होता व्यवहार, अशी व्हायची पैशांची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून अवैध सट्टेबाजी करत सहा हजार कोटी रुपयांचा हवाला व्यवहार करणाऱ्या महादेव ॲपने आपला धंदा चालविण्यासाठी तब्बल दोन हजार ऑपरेटरची नेमणूक केली होती अशी माहिती हाती आली असून, त्या दिशेने तपास यंत्रणा तपास करत असल्याचे समजते.

असा होत होता व्यवहार

सर्व व्यवहारांसाठी या ऑपरेटरना दुबईस्थित महादेव ॲप कंपनीकडून विशिष्ट ओटीपी नंबर देण्यात येत होता. त्याद्वारे त्यांच्या फोनचा ताबा घेत पैशांच्या फिरवाफिरवीचे व्यवहार केले जात होते. संबंधित ऑपरेटर जर तपास यंत्रणांच्या हाती लागला तर या यंत्रणा मुख्य कंपनीपर्यंत पोहोचू नयेत, यासाठी त्या मोबाइल क्रमांकावरून होणाऱ्या पैशांच्या सर्व चॅनलमधून मुख्य कंपनीचे हस्तक लॉग आऊट होत होते. अशा पद्धतीने लॉग आऊट झाल्यानंतर त्या मोबाइलमधील आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती नष्ट होत होती.

अशी व्हायची पैशांची उलाढाल

या ॲपच्या माध्यमातून धंदा करतानाचा कोणताही पुरावा सापडू नये, याकरिता प्रामुख्याने या ऑपरेटरची नेमणूक करण्यात आली होती. पैशांच्या व्यवहारासाठी त्यांना विशिष्ट मोबाइल क्रमांक देण्यात आले होते तसेच त्यावरील सोशल मीडिया किंवा अन्य ऑनलाइन साधनांद्वारे पैशांची फिरवाफिरवी होत असल्याचे समजते. 

टॅग्स :गुन्हेगारीधोकेबाजी