सिडबीकडून स्टार्टअपसाठी २०० कोटी : मुख्यमंत्री फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:11 IST2025-01-17T11:10:18+5:302025-01-17T11:11:49+5:30
Devendra Fadnavis : कौशल्य विकास विभागातर्फे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

सिडबीकडून स्टार्टअपसाठी २०० कोटी : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून (सिडबी) राज्यातील स्टार्टअप उद्योगांसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला ३० कोटी रु. दिले जातील. काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. हे देशातील आधुनिक धोरण असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली.
कौशल्य विकास विभागातर्फे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदीप डांगे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, मेरिको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सहसंस्थापक रॉनी स्क्रूवाला, नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर यासह स्ट्राइड व्हेंचर्स आणि स्ट्राइडवनचे संस्थापक इशप्रीत सिंग गांधी, आयआयटीचे माजी विद्यार्थी कल्याण चक्रवर्ती, गो इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता यांच्यासह विविध क्षेत्रांतील स्टार्टअप सुरू केलेले १००० यशस्वी लघुउद्योजक उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, योजना सुरू झाली तेव्हा ४७१ स्टार्टअप होते. आज देशात एक लाख ५७ हजार आहेत. राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त अभिमानाने सांगावेसे वाटते की, महाराष्ट्रात २६ हजार स्टार्टअप आहेत. आपण असे अभियान राबवित आहोत की, ज्यामध्ये महिला स्टार्टअपमध्ये सर्व पदांवर असतील. मंत्री लोढा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात कौशल्य विकास विभागात सुरू करण्यात आला तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला गती दिली आहे.