Join us

बेस्ट कामगारांना हवा २० टक्के बोनस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 06:01 IST

बेस्ट उपक्रमातील स्थायी, कॅज्युअल लेबर आणि अधिकाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याची मागणी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांनी केली आहे.

मुंबई : बेस्ट उपक्रमातील स्थायी, कॅज्युअल लेबर आणि अधिकाऱ्यांना २० टक्के बोनस देण्याची मागणी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार क्रांती संघ या संघटनांनी केली आहे. तसे निवेदनही पालिका आयुक्त व बेस्ट महाव्यवस्थापकांना १५ दिवसांपूर्वी दिले. मात्र याबाबत प्रशासनाने कोणताही खुलासा केला नसल्याने संघटनेने २४ आॅक्टोबरला आॅगस्ट क्रांती मैदान ते आझाद मैदान अशा मेणबत्ती मोर्चाची हाक दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी ही माहिती दिली.गायकवाड म्हणाले की, बेस्ट प्रशासनासह बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक, बेस्ट समितीचे चेअरमन यांच्याकडे बोनसच्या मागणीचे निवेदन दिले आहे. या निवेदनात २०१७-१८ सालासाठी २० टक्के दराने बोनस (सानुग्रह अनुदान) रक्कम दीपावलीपूर्वी देण्याची मागणी केली होती. मात्र मागणीवर कोणताही खुलासा प्रशासनाने केलेला नाही. आॅगस्ट क्रांती मैदानापासून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :बेस्ट